निगडीत क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे दोघे गजाआड
पुणे, दि. 19 - क्रिकेट मॅचवर सट्टा लावणार्या दोघांना निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिखली येथील हरगुडे वस्ती येथे करण्यात आली. त्यांच्याकडून 92 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. योगेश दत्तात्रय जाधव (वय 31, रा. चिखली) आणि अनिल रामकिसन अगरवाल (वय 45, रा. पिंपरी), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरगुडे वस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विश्वास नाणेकर यांना खबर्यामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला. त्यावेळी आरोपी 20-20 क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असताना दिसले. त्यांच्याकडून नामांकित कंपनीचे चार मोबाईल फोन, एक टीव्ही, 12 हजार रुपयांची रोकड, असा 92 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
