Breaking News

गांधीजींचे छायाचित्र हटविल्याने संतप्त पडसाद

सांगली, दि. 16 - खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर महात्मा गांधीजींच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी झळकल्याप्रकरणी  सांगलीतील स्वातंत्र्यसैनिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. स्टेशन चौकात गांधीजींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करुन केंद्र  शासनाचा निषेध केला.
खादी ग्रामोद्योगच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर महात्मा गांधीजींचे चरख्यावर सूत कातत असलेले छायाचित्र हटवून त्याजागी मोदींचे छायाचित्र झळकले आहे.  सांगलीत स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, जयराम कुष्टे, चंद्ररांत पोरे, रघुनाथ केडगे (तात्या), माधवराव माने यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कृत्यावर जोरदार  टीका केली. महात्मा गांधीजींनी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला होता, म्हणूनच ते चरख्यावर सूत कातत होते. परंतु मोदी यांनी चरख्यावर सूत कातत असणारे  गांधीजींचे छायाचित्र बाजूला ठेवून तेथे स्वतःच छायाचित्र घेतले आहे. गांधीजी स्वदेशीचा पुरस्कार करीत होते, तर मोदी विदेशी वस्तूंटा सर्वाधिक पुरस्कार करीत  आहेत. त्यांना चरख्यावर सूत कातत बसणे शोभत नाही, अशी टीकाही रघुनाथ केडगे, बापूसाहेब पाटील यांनी केली.
जनता दलाचे नेते माजी आमदार प्रा. शरद पाटील, अ‍ॅड. के. डी. शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार, बापूसाहेब मगदूम, काँग्रेस प्रवक्ते राजन पिराळे, विकास मगदूम,  अ‍ॅड. अजित सूर्यवंशी, असिफ बावा, सतीश साखळकर, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे महेश पाटील, अविनाश चौगुले, रत्नाकर गोंधळी, आशिष कोरी, अ‍ॅड. अमित  शिंदे, शमशाद नाईकवडी, जन्नत नाईकवडी यांनीही याप्रकरणी केंद्र शासनाचा निषेध केला.