Breaking News

रस्ता आडवल्याने; राहिंज कुटुंब त्रस्त तहसिल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

अहमदनगर, दि. 20 - श्रीगोंदा तालुक्यातील   काष्टी येथील रहिवासी बाबुराव राहींज या कुटुंबियांचा वाहिवाटीच्या रस्त्यावर भिंत बांधून पायवाटही बंद केल्यामुळे  राहींज कुटुंबीयांतील शाळकरी मुलांना तारेच्या कुंपणावरून उड्या मारून शाळेत जावे लागत आहे. गेल्या 20 दिवसांपासून छगन राहींज व अन्य लोकांनी रस्ता  बंद केल्याचे तहसिलदार आणि पोलीस निरीक्षक यांचे निदर्शनास आणून देऊनही उपयोग होत नसल्यामुळे तारेच्या कुंपणावरून मुलांना उड्या मारून शाळेत जावे  लागत असल्याचे राहींज यांनी सांगितले. 
दि. 29 डिसेंबर रोजी मल्हारी किसन राहींज, सतीश राहींज प्रविण उर्फ शरद राहींज यांनी आम्हास मारहाण केली अशी फिर्याद मैना राजाराम राहींज यांनी दिली  होती. मात्र पोलिसांनी त्यांचेविरुध्द कारवाई केली नाही. तसेच तहसिलदार यांचेकडे तक्रार दाखल करूनही विरोधकांनी वहिवाटीचा रस्ता खुला केला नसल्याचे  राजाराम राहींज यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गेल्या 20 दिवदापासून छगन राहींज व अन्य लोकांनी रस्ता आडवल्यामुळे स्त्रियांना घराचे बाहेर पडता येत नाही. जनावरांना जागीच डांबून ठेवावे लागत आहे.  जायभाय यांचे शेताचे कुंपणावरून मुलांना ऊस शेतीतून शाळेत जावे लागते. वाहिवाटीच्या रस्त्यावर भिंत बांधून तसेच पायवाटेवर काट्या टाकून बंद केलेला  रस्ता खुला केला नाही तर तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे राजाराम राहींज यांनी सांगितले.