Breaking News

प्रत्येकाने नियम पाळले तर 50 टक्के अपघात कमी होतील

। 28 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

अहमदनगर, दि. 13 - अपघातांची संख्या मोठी आहे. वाहन, वाहतुकीचे प्रमाण हेही मोठे आहे. हा विषय शहरापुरता मर्यादित न ठेवता, दिशादर्शक उद्देश ठेवून  काम करावे,विज्ञानामुळे प्रगती झाली आहे. ते शाप कि वरदान याचा विचार केला पाहिजे. रस्ताची लांबी-रुंदी वाढली पण माणसाची लांबी-रुंदी वाढली नाही.  व्यवस्थेवर दोष देतो, पण लोकांनी आपले काम निट केले तर त्यांना दोष देण्याची वेळ येणार नाही, कारण प्रत्येक नियम हे माणसांसाठीच आहेत. माणसाला  परमेश्‍वराने बुद्धी दिली ती कल्याणासाठी तिचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
28 व्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री.कवडे बोलत होते. यावेळी प्रमुख  पाहुणे नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अप्पर पोलिस अधिक्षक घनश्याम पाटील, मनपाचे  उपायुक्त अजय चारठाणकर, पोलिस अधिकारी आनंद भोईटे आदि उपस्थित होते.
कवडे पुढे म्हणाले, सिग्नल तोडल्यावर काय होऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. दुसर्‍याच्या जीवनामध्ये आपल्या चुकीमुळे अपघात होऊन कसे दु:ख सहन  करावे लागतात याचा विचार कुणी केला का? नो पार्किंगमध्ये वाहन लावणे, रोड सेफ्टी पादचारी, यांचाही वाहन चालवितांना विचार केला पाहिजे. रस्ता  सुरक्षेविषयीचा संकल्प वर्षभर नाही तर जीवनभर राबवावा लागेल. त्याचे पालन करणे आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कदम म्हणाले, केंद्र शासनाने वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा  अभियान सुरु केले. यासाठी वर्षभर लोकांना प्रशिक्षित करणे की ज्यामुळे लोकांचे सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम टाळावेत. देशात दरवर्षी अपघातामुळे 1 कोटीचे  नुकसान सोसावे लागते. घराचा कर्ता माणूस गेल्यावर त्या कुटूंबावर होणारे परिणाम, लहान मुलांचे भवितव्य याचाही विचार केला पाहिजे. वाहन हे वरदान नव्हे तर  शाप आहे. लोन घेऊन वाहन घेणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या मानाने नगर जिल्ह्यामध्ये अपघाताचे  प्रमाण कमी आहे. यासाठी बांधकाम विभाग व  संबंधित विभागाने रस्ते व इतर सुविधांकडे लक्ष दिल्यास अपघाताचे प्रमाण आणखी कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले,  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  राजाभाऊ गिते म्हणाले, 1960 साली वाहनांची संख्या 1 लाख होती आता ती 2 कोटी झाली आहे. मोटार वाहन श्रम वाचविणारे आहे. त्यासाठी त्याची देखभाल  महत्वाची आहे. वाहन चालवितांना पुढच्या वाहनाचा अंदाज घेऊन वेग कमी केला पाहिजे. एकाग्रता घेऊन रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. 50 ते 60 टक्के अपघात  दुचाकी वाहनाचे होतात. यासाठी हेल्मेट व सिटबेल्टचा वापर करावा, असे ते म्हणाले. सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी मधुकर वाघमारे यांनी प्रास्तविकात रस्ता  सुरक्षा विषयक सुधारणा झाल्यास अपघात कमी होतील. रिफ्लेटिंग टेप वाहनास लावल्यास अपघात टळतात, असे सांगितले. सूत्रसंचालन अ‍ॅलेक्स कदम यांनी  केले तर आभार शिवज्योती भांबरे यांनी मानले.