Breaking News

मोफत सर्वरोग निदान शिबिरात 300 रुग्णांची तपासणी

लाईफलाईन हॉस्पिटलचे 5 व्या वर्षात पदार्पण

अहमदनगर, दि. 23 - सध्या धकाधकीच्या जीवनात, तसेच व्यायामाच्या अभावामुळे माणसांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले असून, उपचार घेण्यासाठी मोफत  शिबिरांची गरज निर्माण झाली आहे. अशा शिबिरांमधून वेळोवेळी तपासणी करून होणारे संभाव्य आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे अशा शिबिरांचा लाभ  सर्वांनी घ्यावा, तसेच लाईफलाईन हॉस्पिटलने गेल्या 4 वर्षांत अत्यंत अल्पदरात विविध प्रकारच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. 90% भाजलेल्या  रुग्णांना वाचवून अतिशय चांगल्या वैद्यकीय सेवेचा आदेश निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले.
तारकपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सर्वरोग निदान व रक्तदान शिबिराचे उद्घाटन आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते  दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी आ. कर्डिले बोलत होते. याप्रसंगी डॉ. संदीप धुमाळ, डॉ. मनोज जगदाळे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे,  स्थायीचे माजी सभापती संजय गाडे, एन. बी. धुमाळ, महेश धुमाळ, विनित गाडे, अजित खेसे, अमित भगवाने, कुणाल नातू, संतोष शेळके, डॉ. मिलिंद कांबळे,  डॉ. स्वप्नील पाटील. वर्धापनदिनानिमित्त महापौर सुरेखा कदम यांनी आवर्जुन उपस्थित राहून डॉ. संदीप धुमाळ यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
डॉ. अनिल बोरगे म्हणाले की, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आज लाईफलाईन हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापनिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक  चांगला उपक्रम राबविला आहे. अ.नगर मनपाच्या वतीने चालविण्यात येणार्‍या रक्तपेढीमुळे अनेक गरजू व गरीब रुग्णांना कमी दरात रक्त उपलब्ध करून दिले  जाते. रक्तदानामुळे माणसाचे आरोग्य निरोगी राहते, रक्तदान व ज्ञानदान हे दोन्ही दान दिल्याने वाढते, असे ते म्हणाले. एन. बी. धुमाळ व डॉ. मनोज जगदाळे यांनी  मनोगत व्यक्त केले. डॉ. संदीप धुमाळ म्हणाले की, लाईफलाईन हॉस्पिटलच्या वतीने आयोजित या शिबिराचा 300 रुग्णांनी लाभ घेतला. हृदयरोग, मधुमेह,  पक्षघात, दमा, किडनीचे आजार, श्‍वसनरोग, अस्थिरोग व मणकेविकार यासारख्या अनेक आजारांवरील रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.  अनेकांनी आज रक्तदान केले. 4 वर्षांत हॉस्पिटलमध्ये सर्पदंश, विषबाधा, हेड एन्जुरी, हृदयरोग, मधूमेह, अर्धांगवायू, हाडांचे आजार, जळीत रुग्ण, मेंदू, मणके  विकार, पोटाचे आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करून वाचविण्यात आले, असे ते म्हणाले.