Breaking News

अनिवासी भारतीय नागरिकांना नोटाबदलीची मुदत 30 जूनपर्यंत : रिझर्व बँक

मुंबई, दि. 01 - जुन्या नोटा बदलण्यासाठी एनआरआय नागरिकांना 30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर देशातील नागरिकांना 30  डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्याची सवलत रिझर्व बँकेकडून देण्यात आली होती. मात्र अनिवासी भारतीय नागरिकांना नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली  आहे.
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बँकांमध्ये बदलून घेण्याची मुदत 30 डिसेंबर देण्यात आली होती. या मुदतीत जुन्या नोटा न भरु शकलेल्या नागरिकांना 31  मार्च 2017 पर्यंत रिझर्व बँकेत नोटा जमा करता येतील. मात्र दिलेल्या मुदतीत नोटा का बदलून घेतल्या नाहीत याचा खुलासा संबधित नागरिकांना करावा लागेल.  हीच मुदत अनिवासी भारतीयांसाठी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.
 अनिवासी भारतीयांना 30 जूनपर्यंत मुदत देत त्यावर कोणतंही बंधन ठेवण्यात येणार नाही असं रिझर्व बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यांना फेमाच्या  नियमांनुसार ही सवलत देण्यात येईल. एनआरआय नागरिकांना दिलेल्या मुदतीत एकदाच पैसे बदलता येतील. यावेळी त्यांना आपलं ओळखपत्र आणि नोटाबंदीच्या  काळात ते भारताबाहेर असल्याचा पुरावा द्यावा लागेल. तसंच त्यांनी अन्यत्र कुठेही नोटा बदलल्या नसल्याचंही सिद्ध करावं लागेल.