Breaking News

वन डे, टी20 च्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार

मुंबई, दि. 05 - टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वन डे आणि टी20 च्या कर्णधारपदावरुन धोनी पायउतार झाला आहे. मात्र माही टीम इंडियामध्ये खेळत राहणार आहे. बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे. कॅप्टन्सी सोडली असली तरी धोनी वन डे आणि टी20 या दोन्ही फॉमटमध्ये खेळत राहणार आहे. धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
इंग्लंडविरोधात होणार्‍या वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड होणार आहे. या सिलेक्शनसाठी माही उपलब्ध असेल. त्यामुळे वनडे मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल, हे उद्याच स्पष्ट होऊ शकेल. विराट कोहलीकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 30 डिसेंबर 2014 रोजी धोनीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर धोनीनं आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.