Breaking News

रॉजर फेडररचा 18 व्या ग्रँडस्लॅमचा विश्‍वविक्रम

मेलबर्न, दि. 30 - टेनिसस्टार रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पाच सेट्सच्या झुंजीनंतर राफेल नदालचे आवाहन मोडून काढत 18 व्या  ग्रँडस्लॅमचा विश्‍वविक्रम आपल्या नावे केला. रॉजर फेडररने राफेल नदालचे कडवे आव्हान 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3 असे मोडून काढून ऑस्ट्रेलियन  ओपनच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. रॉजर फेडररचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे पाचवे आणि कारकीर्दीतले हे अठरावे विजेतेपद ठरले.
विशेष म्हणजे, फेडररचा हा ऑस्ट्रेलियन ओपनमधील 100 वा सामना होता. पाच वर्षांनंतर फेडररच्या खात्यात ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जमा झाले.
जिंकण्याची अविरत उर्मी, अचंबित करणारे सातत्य ही गुणवैशिष्ट्ये असलेले दोन दिग्गज खेळाडू जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा टेनिस चाहत्यांसाठी एक  विलक्षण संधी असते. 2011 नंतर आज पहिल्यांदाच रॉजर फेडरर आणि राफेल नदाल ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची लढत टेनिस चाहत्यांना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये  पाहायला मिळाली. संपूर्ण जगाचे फेडरर-नदाल लढतीकडे लक्ष लागून होते. सामन्यात फेडररने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जोशात सुरूवात  देखील केली होती. फेडररने पहिला सेट 6-4 ने जिंकून श्रीगणेशा केला होता, तर नदालनेही दुसऱया सेटमध्ये फेडररला जशास तसे प्रत्युत्तर देऊन 3-6 असा  विजय प्राप्त केला. मग फेडररने तिसऱया सेटमध्ये घोटीव फटक्यांचा नजराणा पेश करत 6-1 ने वर्चस्व गाजवले. तिसऱया सेटमधील मानहानीकारक पराभवाचा  कोणताही मानसिक दबाव निर्माण न होऊ देता नदालने चौथ्या सेटमध्ये चांगली सुरूवात केली आणि सेट 3-6 ने जिंकला देखील. चौथ्या सेटमध्ये दोघांमध्ये  अत्युच्च दर्जाची चढाओढ पाहायला मिळाली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये सामन्याला रोमांचक वळण मिळाले होते. दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी कमालीचे द्वंद्व  पाहायला मिळाले.