Breaking News

अहंकारी कौरव आणि जबाबदार पांडव...!

दि. 30, जानेवारी - अहंकार आणि जबाबदारी, कौरव आणि पांडव सेना या शब्दांच्या जोड्या गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः  धुमाकुळ घालीत आहेत. जोडीला पारदर्शक कारभार हा शब्दही लोणच्याची भुमिका खांद्यावर घेऊन आपला राबता दाखवतोय. एखादा चमत्कार घडावा अशा  पध्दतीने या शब्दांनी राजकारणात प्रवेश केला असे नाही तर गेल्या काही महीन्यांच्या घडामोडी पहाता हे अपेक्षित होतेच.
या शब्दांचे प्रवक्ते कोण? आणि या शब्दांना पाळते कोण हे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे सांगण्याची गरज नसावी अन् त्याहूनही ज्या मायबाप जनतेच्या  मतांची भिक पदरात पाडून घेण्यासाठी हा सारा शब्द खेळ सुरू आहे,त्या मतदारांना तर अजिबात त्याची गरज नाही.हे मुद्दामहून इथे सांगण्याचे कारण असे की  युती तुटल्यानंतर शिवसेना भाजपा,काँग्रेस राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात मनसे या बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा यावर व्युहरचना करीत  आहेत.कोण कुठली रणनिती आखते आणि ती रणनिती जनता किती स्वीकारते यावरच परिस्थिती निकाल देणार हे खरं असलं तरी देखिल काही मंडळी बेंबीच्या  देठापासून आम्हालाच परिस्थिती शरण येणार असल्याचे सांगत आहेत.हे कथा कुथन करतांनाच अहंकार,जबाबदारी,कौरव आणि पांडव सेना असे शब्द परवलीचे  बनवले जात आहेत.अर्थात या शब्दांच्या उत्पत्तीला कारभारातील पारदर्शकता कारणीभूत ठरली हे विसरता येणार नाही.या पारदर्शकतेतच खरी गोम आहे.
शिवसेना भाजप युती तुटण्यास याच पारदर्शकतेच्या मुद्याने कळीची भुमिका निभावली आहे.मुंबई महापालिकेत पारदर्शक कारभार असावा अशी अपेक्षावजा  डरकाळी भाजपाच्या शेलार मामांनी फोडल्यानंतर मुळ स्वभावाला धरून मातोश्रीच्या वाघानेही प्रतीत्तुरादाखल सरकारसह सर्वच ठिकाणी पारदर्शक  कारभार ठेवा  अशी आव्हानात्मक डरकाळी फोडली.बस!इथेच पहिली ठिणगी पडली.युती करायचीच नाही अशी दोन्ही बाजूने खुणगाठ पक्की झाल्यानंतर जागा वाटपाच्या  औपचारिक  लखोट्यातून उभय पक्ष एकमेकांच्या इभ्रतीचे वाभाडे काढू लागले.नाही म्हटले तरी कुणाची काय औकात आहे हे जनतेला माहीत आहे आणि या  औकातीचा ताळेबंद 21 तारखेला लिफाफ्यात बंद होणारच आहे.माञ तत्पुर्वीच या मंडळींना स्वतःची औकात ओठावर आणण्याची घाई झाल्याचे दिसते आहे.यातून  मतप्रबोधन किती आणि कसे होणार याचा अंदाज बांधणे अवघड असले तरी जनतेची करमणूक माञ नक्की होते आहे.              
मुळ मुद्दा अहंकार आणि जबाबदारीचा आहे.भाजपाच्या शेलार मामांनी आपल्या वक्तव्यात या बाबीचा आवर्जून उल्लेख केलाय. सत्तेसोबत या दोन गोष्टी हमखास  येतात असा त्यांचा दावा.सत्तेत असलेल्या माणसानेच हा दावा केला म्हटल्यावर नाकारणार तरी कसे? नाही का! जबाबदारीच्या बाबतीत कुणाचा आक्षेप असण्याचे  काही कारण नाही.सत्तेसोबत ती गृहीतच आहे.अहंकाराबाबत माञ तो स्वानुभव अथवा अनुभुती म्हणता येईल.कारण सत्तेसोबत अहंकार येतोच किंवा यायलाच हवा  असे काही गृहीतक नाही.आणि त्याहूनही अधिक स्पष्टच सांगायचे तर सत्तेच्या नावेत बसलेले तुम्ही दोघेही (शिवसेना -भाजपा) सहप्रवासी आहात.कुणी काय  जबाबदारी पार पाडलि अन् कुणाला अहंकाराने पछाडले याचे परिक्षण तटस्थपणे व्हायला हवे.तो हिशेब तुम्ही कसा मांडू शकता? तो निर्णय जनतेला घेऊ द्या  ना...विषय अहंकाराचा सुरू आहे तर त्याविषयी अधिक खोलात जाणे योग्य ठरेल.अहंकार लपून राहणारी गोष्ट नाही चालण्या बोलण्यातून नजरेतून एकुणच  वागण्यातून म्हणजेच देहबोलीतून  अहंकार पाझरल्याशिवाय राहात नाही.मायबाप मतदारांच्या नजरेतूनही तो सुटतही नाही. म्हणूनच राजकारणातील शेलार मामा  किंवा स्वयंघोषित सामनाकारांनी त्याची विशेष चिंता करण्याची गरज नाही.शिवसेना किंवा भाजपा अथवा काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासारखे इतर राजकीय पक्षातील  मंडळींना कमी अधिक प्रमाणात अहंकाराने पछाडले आहेच.त्यातही शेलारमामा सांगतात त्याप्रमाणे सत्तेच्या अहंकारासोबत आलेली जबाबदारी ज्यांनी जबाबदारी  ओळखली त्या वीटा मतदारांसाठी मऊ ठरतात.याची जाणीव झाली तरी पुरे. उडदामाजी काळे गोरे कसे निवडायचे हे आता जनतेला चांगलेच माहीत झाले  आहे.त्या पहिले प्रात्याक्षिक येत्या 3फेब्रूवारी रोजी होणार्या विधानपरिषदेसाठी पाच विभागात  होणार्या मतदानात दिसणार आहेच.जबाबदारीचा पदर पुढे करून  अहंकाराला लपविता येत नाही.हाच धडा हे निकाल देतील.तेंव्हाच अहंकारी कौरव आणि जबाबदार पांडव यांच्या दरम्यान पुसट असलेली सीमा रेषा अधोरेखित  होईल.