Breaking News

शेतीच्या वादातून मारामारी, 1 ठार 8 जखमी ः (सिंदूर, जत) येथील घटना

सांगली, दि. 29 - सिंदूर (ता. जत) येथे शेतातील बांधाच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत पिरगोंडा रुद्रगौंडा पाटील (55) या शेतकर्‍याचा खून  झाला. सिंदूर येथील बसस्थानकासमोर सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. या मारामारीत आठजण जखमी झाले.
पिरगोंडा पाटील व गुराप्पा बाळाप्पा हिप्परगी या दोघांचा शेतजमिनीतील बांधावरुन वाद आहे. जमिनीची कोणत्याही प्रकारची मोणी न झाल्याने, बांध नेमका  कोणत्या शेतात येतो, हे स्पष्ट झालेले नाही. आठ दिवसांपूर्वी हिप्परगी यांनी जेसीबीने पाटील यांचा बांध फोडल्याचा संशय पाटील यांना होता. बांध का फोडला,  यावरुन दोघांमध्ये अनेकवेळा वाद झाला होता.
गावात प्रजासत्ताक दिनाचा ध्वजवंदन कार्यक्रम संपल्यानंतर पिरगोंडा पाटील गावातील बसस्थानकासमोर येऊन थांबले होेते. त्याचवेळी गुराप्पा हिप्परगीही तेथे  आले होते. बांध फोडल्याच्या कारणावरुन या दोघांमध्ये तेथे पुन्हा वादाचा भडका उडाला. या दोघांत झालेल्या मारामारीत हिप्परगी यांना जादा मार लागल्याने, ते  रागाने गेले आणि नातेवाईकांसह काठ्या, कुर्‍हाडी, गज घेऊन आले. तोपर्यंत पाटील यांनीही नातेवाईकांना बोलावून घेतले होते. सकाळी-सकाळीच दोन्ही गटांत  तुंबळ हाणामारीस सुरुवात झाली. एकमेकांवर काठ्या, कुर्‍हाड, गजाने घाव घालण्यात आले. यात दोन्ही बाजूचे आठजण जखमी झाले. यामध्ये पिरगोंडा पाटील  यांना कुर्‍हाडीची वर्मी घाव बसल्याने ते जाग्यावरच कोसळले. नातेवाइकांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
हाणामारीत आठजण जखमी झाले असून, त्यातील शिवकांत पाटील, गौडाप्पा पाटील, चिदानंद मदभावी, मारुती मदभावी, आप्पासाहेब पाटील यांची प्रकृती गंभीर  आहे. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पिरगोंडा पाटील यांचा मुलगा शिवकांत याने जत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पाटील यांच्या खूनप्रकरणी दहाजणांविरोधात जत पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.