Breaking News

नोटा बंदीने उद्योजकांचे कंबरडे मोडले

सांगली, दि. 26 - हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर नवीन चलन पुरेशा प्रमाणात नसल्याचा फटका जिल्ह्यातील उद्योगाला बसला आहे. ग्राहकांची  मागणी 50 टक्क्याने कमी झाल्यामुळे कुपवाड, मिरज आणि विटा येथील औद्योगिक वसाहतींमधील व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी 16 हजार 500  कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर झाला असून उद्योजकांकडून कामगार कपा केली जात आहे.
सांगली, मिरज, विटा, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, इस्लामपूर, शिराळा येथे शेती प्रक्रियेवर छोटे-मोठे उद्योग उभे राहिले आहेत. साखर कारखाने, अन्य  कारखान्यांना लागणारे सुटे भाग तयार करणारे, पीव्हीसी पाईप, पापड, लोणची, चटई, ऑईल मिल असेही छोटे उद्योग सुरु आहेत.
सध्या शेतकरी आणि अन्य ग्राहकांकडे पुरेशाप्रमाणात चलन नसल्यामुळे या उत्पादकांना मागणीच नाही. शेतकरी नव्याने कोणतेही काम सुरु करीत नाही. मागणीत  50 टक्क्याने घट झाल्यामुळे उत्पादन थांबविले आहे. दोन ते तीन पाळ्यांमध्ये सुरु असलेले काम आता एका पाळीमध्येच सुरु आहे.
कामगारांचे पगार भागविणेही कठीण झाले आहे. चलन टंचाईचा प्रश्‍न सरकारने लवकर सोडवला नाही, तर भविष्यात कामगार कपात केल्याशिवाय पर्याय नाही,  असे कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे मत आहे. कुपवाड औद्योगिक वसाहतीशिवाय, दत्तनगर, सावळी येथील उद्योगांच्या उलाढालीवर परिणाम झाला  आहे. विट्यात यत्रमागांसह कार्वे (ता. खानापूर) येथील न्यू. इंडिया डेक्स्टाईल पार्कमध्ये कापड तयार होत आहे. किरकोळ कापड दुकानांमध्ये मागणी थांबल्याचा  फटका वस्त्रोद्योगाला बसल्याचे उद्योजक सांगत आहेत. जिल्ह्यातील उद्योगांमध्ये सुमारे 16 हजार 500 कामगार असून मंदीमुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर  बनल्याचे दिसत आहे.