Breaking News

भाजपची बनवाबनवी सुरुच ः अजित पवार

पुणे, दि. 26 - नोटांबंदी होऊन 45 दिवस उलटले तरी नागरिकांचे हाल सुरुच आहेत. व्यापार्‍यांचा धंदा बसलाय, शेतकरी अडचणीत सापडलाय, बेरोजगारी  वाढलीय तरी एटीएमसमोरील रांगा कमी झाल्याचे भाजपचे शहाणे सांगत सुटले आहेत. भाजपची बनवाबनवी सुरुच असून आपल्याला ते दुतखुळे समजताहेत.  ’कॅशलेस’ व्यवहारांमुळे अंबानींसह चायनीज कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या 60 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रम रविवारी (दि.25) अजित पवार यांच्या हस्ते पार  पडले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर शंकुतला धराडे अध्यक्षस्थानी होत्या. माजी आमदार विलास लांडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सभागृहनेत्या मंगला कदम,  स्थायी समिती सभापती डब्बू आसवानी आदी उपस्थित होते. तासाभराच्या भाषणात अजितदादांनी नोटाबंदी, भ्रष्टाचाराचे आरोप, स्मार्ट सिटीतील सहभाग यांचा  परामर्श घेत भाजप सरकारचे वाभाडे काढले.
पवार पुढे म्हणाले की, अरबी समुद्रातील शिवरायांच्या ऐतिहासिक स्मारकासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने पाठपुरावा केला. त्या जागेची निश्‍चिती केली.  विविध ना हरकत दाखले मिळविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात आम्हाला अपयश आले. मात्र, अडीच वर्षानंतर ना हरकत दाखले मिळविणार्‍या भाजपने स्मारक  भूमिपूजनाचाही ’इव्हेंट’ केला. त्यावर अठरा कोटी रुपये खर्च केले. महापालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोठा गाजावाजा केला. मावळे बाजूला आणि  तलवारबाजी करताहेत भाजपवाले, असे चित्र पाहायला मिळाले’’.
दहशतवाद्यांकडे नकली नोटा सापडल्या, मोठ्यांनी काळे पैसे पांढरे केले, हे पंतप्रधानांना कळलंच नाही. धनगर समाज, मराठा समाज, मुस्लिमांना आरक्षण देऊ  म्हणणारे भाजपवाले आता गपगार आहेत. वेगळ्या विदर्भाची भाषा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गपगुमान आहेत. मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या सांसद  ग्राम योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं पाहायचं वाकून अशा प्रवृत्तीचे भाजपवाले राष्ट्रवादीवर बिनबुडाचे आरोप करत  आहेत. राष्ट्रवादीची बदनामी, प्रतिमा मलिन करण्याचे काम ते करत आहेत. भाजपच्या खोट्यानाट्या आरोपांना बळी पडू नका असे आवाहन अजित पवार यांनी  केले.
मतं मिळवायची असेल तेव्हा भाजपला डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय आठवतात. केंद्राची निवडणूक असली की भाजपवाले प्रभू रामचंद्रांचा तर  राज्यातील निवडणुकांसमयी छत्रपती शिवरायांचा जयघोष करतात. निव्वळ भावनिक राजकारण करुन लोकांची दिशाभूल करायची अन् मतं मिळवायची हा  भाजपचा अजेंडा आहे, असा घणाघाती आरोपही अजितदादांनी केला. छत्रपती शिवरायांच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमाचा गाजावाजा करणार्‍या,  जाहिरातबाजीवर अठरा कोटी रुपये खर्च करणार्‍या भाजपवाल्यांचे राजकारण पाहून छत्रपती शिवरायांनाही आश्‍चर्य वाटले असेल, असा टोलाही त्यांनी लगाविला.