Breaking News

एसटीचे प्रवासी वाढवा विशेष अभियान

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) : परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या सूचनेनुसार 1 जानेवारी 2017 पासून  एसटी महामंडळामार्फत प्रवासी वाढवा विशेष अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह  देओल यांनी दिली.
एसटीचा घटता प्रवाशी संख्येचा टक्का कमी करुन उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील 250 आगारांच्या पातळीवर या अभियानाची सुरुवात होत असून 1  जानेवारी ते 31 मार्च 2017 या तीन महिन्याच्या कालावधीत चालणार्‍या अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या आगारास दरमहा 1 लाख रुपयांचे रोख बक्षिस  देण्यात येणार आहे. तसेच व्दितीय क्रमांकावरील आगारास 75 हजार रुपयांचे व तृतीय क्रमांकावरील आगारास 50 हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले जाणार आहे.
त्याचबरोबर या अभियानांतर्गत उत्कृष्ट सांघिक कामगिरी बजावणार्‍या विभागास 50 हजार रुपयाचे विशेष बक्षिस दिले जाणार आहे.
एसटीच्या चालक वाहकांना प्रवासी वाढविण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्याकरीता प्रत्येक आगार पातळीवर या अभियान कालावधीत सर्वाधिक प्रवासी वाहून  नेणार्‍या वाहकास दरमहा रोख 5 हजार रुपयाचे बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच त्याला या कामगिरीमध्ये साथ देणार्‍या चालकाला 3  हजार रुपये  रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. या अभियानामुळे गेली चार-पाच वर्षे एसटीपासून दुरावलेला प्रवासी एसटीकडे वळण्यात सुरुवात होईल, असा विश्‍वास  एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देओल यांनी व्यक्त केला आहे.