Breaking News

भ्रष्ट कारभाराविरोधात बोलणार्‍या दोघांना राष्ट्रवादी नगरसेवकाच्या समर्थकांकडून ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे, दि. 27 - महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बोलणार्‍या रिपब्लिकन सेनेच्या नेत्यासह कार्यकर्त्याला राष्ट्रवादी नगरसेवकाच्या  समर्थकांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना साडेबारा ते एकच्या दरम्यान निगडी येथील ओटास्किम भागात असलेल्या आझाद चौकाजवळ घडली.
 रजनीकांत उत्तम क्षीरसागर (वय 48, रा. उरवेला हौसिंग सोसायटी, बिल्डिंग क्रं. 5 रुम क्रं 309) व त्याचा सहकारी अमित अप्पासाहेब गोरे (वय 22, रा.  उरवेला हौसिंग सोसायटी, बिल्डींग क्रं 5 रुम क्रं 401, ओटास्किम निगडी) अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी हौसराव शिंदे, बाळा बरगले, सागर शिंदे, राजू शिंदे, उमेश आव्हाड, विशाल झेंडे (सर्व रा. उरवेला हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी)  यांच्याविरोधात रजनीकांत याचा भाऊ रतीलाल उत्तम क्षीरसागर (वय 46, रा. भिमाईनगर, ओटास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान निगडी येथील ओटास्किम भागात एका खाजगी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी ओटास्किम झोपडपट्टीतील समस्याबाबत  रहिवासी यांच्या मुलाखती घेत होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले रिपब्लिकन सेनेचे रजनीकांत क्षीरसागर यांनी  झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरणी महापालिकेतील  सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्ट कारभार कारणीभूत असल्याचे सांगितले.  यावेळी तेथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकाच्या समर्थकांनी  क्षीरसागर व त्यांचे सहकारी गोरे यांना शिवीगाळ केली. तसेच मैदानात या एकाएकाला बघून घेतो, अशी धमकी देवून त्यांच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार  मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान यासर्व प्रकारामुळे आता शहरातील नागरिकांना राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात बोलण्यासही भीती वाटू लागली आहे. तसेच त्यांच्या विरोधात आवाज  उठवणार्‍यांना धमकी देवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नागरिकांतून सांगितले जात आहे.