Breaking News

दुधवाल्याने केला महिलेचा निर्घृण खून; नदीत आढळला मृतदेह

पुणे, दि. 27 - उसने घेतलेले पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने महिलेचे अपहरण करुन तिचा कु-हाडीने घाव घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज  (सोमवारी) हडपसर परिसरात उघडकीस आला आहे. तसेच मृतदेह मुळा -मुठा नदीत फेकून दिला होता. 
कमल वसंत शिंदे (वय 55, रा. ससाणेनगर, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संतोष किसन हंडगर (वय 30, रा. माणिकनगर, मांजरी  वस्ती, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कमल शिंदे यांची भाची विजया गणेश बांदरगे (रा. रविवार, पेठ) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष हा कमल शिंदे यांच्या घरी दुध घालत होता. कमल शिंदे यांचे पती लष्करात होते. त्यांचे निधन झाले आहे.  आरोपी संतोष याने त्याच्यासाठी आणि त्याच्या ओळखीच्या नागरिकांसाठी कमल शिंदे यांच्याकडून उसने पैसे घेतले होते. शिंदे यांनी पैसे परत देण्याचा  आरोपीकडे तगादा लावला होता.
11 डिसेंबर रोजी आरोपी संतोष याने पैसे परत करण्याच्या बहाण्याने कमल शिंदे यांना घरी नेत असल्याचे भासवून घेऊन गेला होता. त्याने त्यांचे सोन्याचे दागिने  काढून घेतले आणि कु-हाडीने वार करुन त्यांचा निर्घृण खून केला. तसेच मृतदेह मुळा-मुठा नदीच्या शेजारील दलदलीमध्ये फेकून दिला.
तपासादरम्यान पोलिसांना संतोष याच्या हालाचालीबाबत संशय आला. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने  उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसी खाक्या दाखवताच उसने पैसे परत द्यायला लागू नयेत यामुळे कमल शिंदे यांचा खून केल्याची कबूली दिली. हडपसर पोलीस  तपास करत आहेत.