Breaking News

‘अच्छे दिन’ पर्वाला धोक्याचा इशारा देण्यासाठी फडकविला लाल झेंडा

। दिल्लीगेटला ‘मोदीमंदी अर्थव्यवस्था’ आक्रोश आंदोलन करण्यात आले

अहमदनगर, दि. 27 - केंद्र सरकारने नोटबंदीची पुरेशी तयारी न केल्याने शहरासह ग्रामीणभागाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना पिपल्स हेल्पलाईनच्या  वतीने दिल्लीगेट समोर मोदीमंदी अर्थव्यवस्था आक्रोश आंदोलन करण्यात आले. 
 चलन उपलब्ध होत नसल्याने गळ्यात कवड्यांच्या माळा घालून कार्यकर्त्यांनी आक्रोश केला. नागरिकांना कवड्या, रेवेड्यांचे वाटप करुन, अच्छेदिन पर्वाला  धोक्याचा इशारा देण्यासाठी लाल झेंडा फडकविण्यात आला. एक देश एक नेता ही प्रवृत्ती घातक ठरणारी असून, फॅसिस्ट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी हिटलचा  प्रतिकात्मक पुतळा पायाखाली तुडविण्यात आला. आंदोलनात कॉ.बाबा आरगडे, अ‍ॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू  सुंबे, बाबा शेख, यमानाजी म्हस्के, ओम कदम आदिसह पिपल्स हेल्पलाईनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 जुन्या 1000 व 500 रु. च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय चांगला असला, तरी त्याची योग्य तयारी न केल्याने त्याचे परिणाम सामान्य जनतेला भोगावे  लागत आहे. दररोज येणार्या वेगवेगळ्या नियमाने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. सामान्य जनता रांगेत थांबली असताना मोठ्या भांडवलदारांना बँक अधिकारी  पैसे पुरवण्याच्या घटना समोर येत आहे. भारत कॅशलेस होण्यासाठी काही काळ लागणार असून चलन तुटवडा भरुन काढण्यासाठी ठोस उपाययोजना  सरकारकडून राबविणे अपेक्षित असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले.
चलन तुटवडा असताना शेती मालाचे भाव कोसळल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था संपुर्णत: कोळमडली आहे. दुबळ्या घटकांचे रोजगार बुडून चलन तुटवड्याने  बाजारपेठ ठप्प झाली आहे.
जणू आर्थिक मंदिचे सावट अनुभवयास मिळत असल्याचे मत कॉ.बाबा आरगडे यांनी व्यक्त केले. मोदी सरकारने घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाने काळाधन बाहेर  येण्याचे चित्र धुसर होत असून, घेतलेल्या निर्णयाने सर्वसामान्य जनताच भरडली गेल्याचे अशोक सब्बन यांनी सांगितले. एक देश एक नेता ही हुकुमशाही व्यवस्था  देशात अनुभवयास मिळत असल्याचे प्रकाश थोरात म्हणाले.