Breaking News

श्रेयवादाची लढाई !

दि. 26, डिसेंबर - शिवस्मारकाचे भूमीपुजन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र शिवस्मारकाचे भूमीपुजन करत असतांनाच विविध पक्षात स्मारकासाठीचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. पंतप्रधांनानी भुमिपुजन केल्यानंतर बीकेसी येथील जाहीर सभेत पंतप्रधानांसमोर नारे देऊन आपले शक्तीप्रदर्शन करण्यात धन्यता मानणार्‍या, आणि आमच्यामुळेच स्मारक होत आहे, असा आव आणणार्‍यांचे केविळवाणे प्रदर्शन जनतेने आपल्या डोळयांनी पाहिले. अर्थात स्मारकाचे श्रेय घेण्यासाठी सर्वच पक्ष उतावीळ झाल्याचे दिसले असले, तरी रस्सीखेच मात्र भाजपा-शिवसेना या मित्रपक्षातच प्रामुख्याने दिसून आली. राज्यातील मित्रपक्षांची अशी भांडणे चालू असतात, जशी नळावर पाणी भरत असतांना चालु असतात. अर्थात यामागे स्त्रियांना दोष देण्याचा हेतू नसून, वस्तुस्थितीचे वर्णन करण्यासाठी ही उपमा वापरली आहे. तुझ न माझं जमेना, आणि तुझ्यावाचुन करमेना, अशीच या राजकीय खेळाची गंमत बघायला मिळत आहे. तु कर मारल्यासारखे आणि मी करतो रडल्यासारखे असे तंतोतंत वर्णन आपल्याला या मित्रपक्षाचे बघायला मिळत आहे. आतापर्यंतच्या इतिहासात मित्रपक्षांनी असो किंवा भाजपा- सेना यांनी इतक्या खालच्या स्तरावर जावून टीका कधी केली नाही. मात्र आता टीकेचा सुरच बदललेला आहे. अर्थात हा रडीचा डाव मुबंई पालिकेत आपली सत्ता कशी येईल यासाठी रचलेले मनोरे आहे. त्यामुळे आपणच कसे वरचढ आहो, यासाठीच सगळा अट्टाहास दिसून येत आहे. वेगवेगळे लढायचे म्हणजे पक्षांला जागा चांगल्या मिळतात, त्यांनतर युती करायचा असा जरी या मित्रपक्षांचा डाव असला तरी जे विधानसभा निवडणूकीत झाले ते पालिका निवडणूकीत देखील होईल, याची काही शाश्‍वती नाही. प्रत्येकवेळेस आपलेच फासे बरोबर पडतील असे नाही, त्यासाठी अदलाबदल करावी लागते. मात्र या सेना - भाजपाच्या कलगीतुरातून पक्षांची नाचक्की किती होत आहे, याची जाणीव या दोन्ही पक्षांना नसल्यामुळेच हा डाव पुढे घेवून जांताना दिसत आहे. सत्ता मिळविण्यासाठी, मतांसाठी मित्र पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. या लढाईच्या सुरुवातीला भाजपा शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सेना देखील सत्तेत राहून आपला अस्मिता जपण्याची धडपड करतांना दिसत आहे. मात्र हे वाद महापुरूषांच्या स्मारकाच्या भुमीपुजनावरूप उफाळून यावे यासारखी शोकांतिका नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक असावे अशी इथल्या तमाम जनतेची मागणी होती. त्यामुळे सर्व सोपस्कार पार पाडत अखेर भुमीपुजनाचा कार्यक्रम दिमाखात झाला. हा राज्याचा कार्यक्रम नसून भाजपाचा अंतर्गत कार्यक्रम असल्यासारखीच आखणी करण्यात आली होती. त्यामुळेच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा, लाजीरवाणा प्रकार सुरू झाला. महापुरूषांचे भव्य उदात्त विचार आत्मसात करण्याची इथे कुणाचीच तयारी नाही. मात्र त्याच महापुरूषांच्या विचांराना स्मारकात बंदिस्त करण्याचा डाव इथल्या काही प्रस्थापितांनी आखला आहे.