उत्तराखंड निवडणूक स्क्रीनिंग कमिटी मध्ये आ.सपकाळ
बुलडाणा, दि. 26 - उत्तराखंड मध्ये होणार्या आगामी विधान सभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने उमेदवार निवड समिती (स्क्रिनिंग कमिटी) जाहीर केली असून त्यामध्ये आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षी जानेवारी- फेब्रुवारी च्या सुमारास होणार्या उत्तराखंड निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने रणनीती आखण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय स्क्रिनिंग कमिटी जाहीर केली आहे. त्यामध्ये उत्तराखंड च्या काँग्रेस प्रभारी तथा सरचिटणीस अंबिका सोनी, प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय, उत्तराखंड चे मुख्यमंत्री हरीश रावत, अविनाश पांडे आणि आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ हे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पातळीवर सचिव पदाचा दर्जा आहे. या कमिटीतील त्यांचा समावेश हा बुलढाणा जिल्ह्यासाठी एक प्रकारे बहुमानच आहे.