Breaking News

स्टार्कचा मार, पाकिस्तान गार, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय!

मेलबर्न, दि. 30 -  पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीतही ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला एक डाव आणि 18 धावांनी पाणी पाजून, तीन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात टाकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या पाकिस्तानने 9 बाद 443 धावा ठोकल्या होत्या. सलामीवीर अझर अलीने धडाकेबाज नाबाद 205 धावा ठोकल्या. त्याशिवाय असद शफिकच्या 50 आणि तळाचा फलंदाज सोहेल खानने 65 धावा करत,  पाकिस्तानला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मदत केली.
मात्र घरच्या मैदानात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं.  कांगांरुंनी पहिल्या डावात 8 बाद 624 धावांचा  डोंगर उभा करुन, पाकिस्तानवर 181 धावांची आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेविड वॉर्नने 144, उस्मान ख्वॉजा 97, कर्णधार स्टिव्ह स्मिथने  नाबाद 165 तर गोलंदाज मिचेल स्टार्कने 84 धावा केल्या. दुसरीकडे आधीच ढेपाळलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना पाचव्या दिवशी मैदानावर उभं राहणंही कठीण  झालं. पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला दुसर्‍या डावात अर्धशतक झळकावता आलं नाही. केवळ दोन फलंदाजांनाच 40 पेक्षा जास्त धावा करता आल्या.
पाकिस्तानचा आख्खा डाव 163 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ही कसोटी 18 धावांनी जिंकली आणि मालिका खिशात टाकली.ऑस्ट्रेलियाकडून दुसर्‍या  डावात मिचेल स्टार्कने 4, नॅथन लियॉनने 3 विकेट घेतल्या. तर हॅजलवूडला 2 आणि जॅक्सन बर्डला 1 विकेट मिळाली.