Breaking News

फायनान्स कंपन्यांकडून महिलांना त्रास

सांगली, दि. 31 - खानापूर तालुक्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिला वर्गाला त्रास दिला जात आहे. सध्याच्या चलन टंचाईमुळे कर्जाचे हप्ते व व्याज  वेळेत भरणे अडचणीचे झाले असताना, या कंपन्यांकडून महिलांना नाहक त्रास देण्याचे काम सुरु झाले आहे, ते तात्काळ थांबवावे, अन्यथा खानापूर तालुका  युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष अजित जाधव यांनी दिला.
खानापूर तालुक्यातील महिलांनी खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून उद्योग व व्यवसायासाठी कर्ज स्वरुपात रक्कम घेऊन त्याव्दारे घरगुती व्यवसाय सुरु  केलेले आहेत. त्याकरिता ग्राहकांनी वैयक्तिक स्वरुपात रक्कमही गुंतविली आहे. पण सध्या चलन तुटवडा असल्याचे कर्जाचे हप्ते व व्याज वेळेत भरणे कर्जदारांना  अडचणीचे झाले आहे. तरीही कंपन्यांचे वसुली अधिकारी व कर्मचारी महिलांना वसुलीसाठी नाहक त्रास देत आहेत. रात्री-अपरात्री घरी जाणे, अपमानास्पद  वागणूक देणे, अपशब्द वापरणे असे प्रकार सुरु आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे.    काही कंपन्या आरबीआयच्या नियमांचा भंग करीत  आहेत. व्याजाची आकारणीही नियमापेक्षा जास्त केली जाते. हप्ता उशिरा दिल्यास अनावश्यक दंड आकारणे व गरज नसताना अनावश्यक वस्तू महागड्या दराने  विकत घेण्यास प्रवृत्त केले जाते. अशा गोष्टींना तातडीने आळा बसला पाहिजे. त्यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांचे परवाने तपासून, त्यांच्याकडून महिला  ग्राहकांना होणारा त्रास तातडीने बंद करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक राष्ट्रवादीचे खानापूर तालुकाध्यक्ष अजित जाधव यांनी  दिला आहे. याबाबतचे निवेदन जाधव यांच्यासह सुमारे 60 महिलांना तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिले.