Breaking News

सातारकर पाठीशी असल्यामुळे मोठे यश : न्या. दिलीप भोसले

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : देशातील सर्वात मोठे उच्च न्यायालय असणार्‍या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी निवड झाली आहे. त्यामध्ये  सातारा जिल्ह्याचा सिंहाचा वाटा आहे. हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या पाठीवर तुमचा हात होता म्हणून हे यश मिळाले आहे. सातारकर कोणाच्याही  पाठीमागे उभे राहिले की ती व्यक्ती मोठी होते. हा इतिहास असून सातारकरांनी मला पाठिंबा दिल्यामुळे आपण इथपर्यंत गेलो आहे, असे प्रतिपादन अलाहाबाद  उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कलेढोण गावचे सुपुत्र न्या. दिलीप भोसले यांनी केले.  
सातारा जिल्हा न्यायालयात सातारा जिल्हा बार असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात न्या. भोसले बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ.  अरूंधती भोसले, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डी. जी. कर्णिक प्रमुख पाहुणे होते. तसेच उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश संभाजी शिंदे, जिल्हा  न्यायाधीश बी. यु. बेबडवार, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमरसिंह भोसले उपस्थित होते.
न्या. दिलीप भोसले म्हणाले, अलाहाबाद उच्च न्यायालयात मोतीलाल नेहरूंपासून अनेक मोठ्या व्यक्तींनी काम केले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करताना  नेहमीच दबाव असतो. येथे वेगवेगळ्या विचारांचे गट असल्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. उच्च न्यायालयात सद्या 87 न्यायाधीश असल्याने हे  देशातील सर्वात मोठे उच्च न्यायालय आहे. अशा ठिकाणी मी काम करतो. मी स्वत: ग्रामीण जीवन अनुभवले आहे व शेतकरी व शेतमजूर पाहिले आहेत. त्यामुळे  प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा प्रकारचे काम मी करणार आहे. मी दिलेला प्रत्येक निकाल वाचला की तुमची छाती अभिमानाने फुगेल. आज जो माझा सत्कार  घेतला त्याच्या आभारासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 16 वर्षापूर्वी मी न्यायाधीश झालो तेव्हा सातार्‍यात पहिला सत्कार झाला होता. आजही तो प्रसंग माझ्या  डोळ्यासमोर उभा राहतो. मोठ्या पदावर काम करताना कामाचा तणाव कमी करून चार्ज होण्यासाठी मी सातार्‍यात येतो. अलाहाबाद येथे काम करत असलो तर  माझी आणि सातार्‍याची नाळ जोडली गेली असल्याचे न्या. भोसले यांनी बोलताना सांगितले.  
यावेळी न्या. डी. जी. कर्णिक, न्या. संभाजी शिंदे, अ‍ॅड. के. आर. शहा यांनी मनोगत व्यक्त केले. अ‍ॅड. अमरसिंह भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अ‍ॅड.  अभिजित डांगे, अ‍ॅड. हेमंत लावंड, अ‍ॅड. मुकुद सारडा, अ‍ॅड. दिलीप पाटील, अ‍ॅड. नितीन शिंगटे  तसेच बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते.
सत्कार समारंभादरम्यान, यावेळी न्या. दिलीप भोसले यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात ई-लायब्ररीचे उदघाटन करण्यात आले.