Breaking News

लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेतही आता हायस्पीड वायफाय!

मुंबई, दि. 03 - मुंबईतील लोकल रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय उपलब्ध करुन दिल्यानंतर रेल्वे प्रशासन प्रवाशांना आणखी खुश करण्याच्या तयारीत आहे. लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये फ्री हायस्पीड इंटरनेट सुरु करण्याचा ‘रेलटेल’चा मानस आहे. मुंबईत मध्य आणि पश्‍चिम रेल्वेवरील लोकलमध्ये हायस्पीड वायफाय उपलब्ध होणार आहे. रेलटेलतर्फे यासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. वायफायसोबत सीसीटीव्ही कॅमेरेही लांब पल्ल्याच्या आणि उपनगरी गाड्यांमध्ये बसवण्यात येतील. वायफायबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून जातीने लक्ष घालण्यात येत आहे.
2018 पर्यंत सर्व उपनगरी लोकल रेल्वेमध्ये वायफाय बसवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात सर्व उपनगरी गाड्या आणि राजधानी, शताब्दी, दुरांतो सारख्या 100 लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. वायफायचा स्पीड 45 असेल, तर 30 मिनिटे इंटरनेट वापरल्यानंतर ब्राऊजिंगचा वेग कमी होईल. मुंबईतील प्रत्येक लोकलमधील अंदाजे 1200 प्रवासी एकाच वेळी हायस्पीड वायफाय वापरु शकतील. म्युझिक, व्हिडिओ, आयपीटीव्ही, गेम्स खेळण्याचा आनंद प्रवासी घेऊ शकतील. त्यामुळे लोकल प्रवाशांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.