Breaking News

इस्लामपूरमधील जनतेचा कौल मान्य ः जयंत पाटील

सांगली, दि. 30 - पालिका निवडणुकीत आमचा झालेला पराभव आम्ही स्वीकारतो. आम्हांला 14 जागा तर विरोधकांना 13 जागा मिळाल्या असून, आम्ही त्यांना या शहराच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य व मदत करु. शहरातील जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली. दहशत व गुंडगिरीचा फटका आमच्या उमेदवारांना बसल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले, आमचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्ही यावेळी 28 पैकी 20 उमेदवार नवखे दिले, नव्या चेहर्‍यांना, सुशिक्षितांना संधी दिली. अशा ठिकाणी विरोधकांच्या दहशत व गुंडगिरींचा आमच्या उमेदवारांना  फटका बसला. या परिस्थितीची आम्हांला 17, 18 नोव्हेंबरपासून माहिती होती. ते म्हणाले, शहरातील विकासाची गती त्यांनी कायम ठेवली. त्यांना आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
बहुमत कोणाचे.... आमदार पाटील यांनी, आमच्या 14 तर विरोधकांच्या 13 जागा आहेत. मग पालिकेत सत्ता कोणाची, असा सवाल मिश्किलपणे केला. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असणारे नवनिर्वाचित नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची फिरकी घेतली. पालिकेत 11-12 अशी परिस्थिती असताना तुम्हांला 12 वे मत कोणी दिले असे विचारुन आ. पाटील यांनी नगराध्यक्षपदाचे स्वतंत्र मत केंव्हा विचारात घेतात, असा प्रश्‍न केला.