Breaking News

वसंतदादा शासकिय रुग्णालयात चार डायलेसिस युनिट

सांगली, दि. 30 - सांगली कोल्हापूरसह कर्नाटकातील गरीब, गरजू कुटुंबाचे आधारवड असलेल्या सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयास आमदार शिवाजीराव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून 4 डायलेसिस युनिट अ‍ॅरो प्लॉट मंजूर झाले आहेत. 
रुग्णालयात आता यापुढे रुग्णांवर मोफत डायलेसिस उपचार होणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.  सांगली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या अधिपत्त्याखाली वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सुरु आहे. 380 खाटांची सोय असलेल्या या रुग्णालयात डायलेसिसची सुविधा नव्हती.
याबाबत 15 ऑक्टोबरला वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अ‍ॅड. डॉ. डी. जी. पाटील, डॉ. के. जे. लोखंडे यांनी आ. नाईक यांच्याकडे डायलेसिस सुविधेची मागणी केली होती. आ. नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या योजनेसाठी वसंतदादा रुग्णालयात 4 डायलेसिस युनिट देण्याचा प्रस्ताव पाठविलेला होता.
जिल्हाधिकार्‍यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आ. नाईक यांच्या फंडातून रुग्णालयास 4 डायलेसिसची युनिट उपलब्ध होणार आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांबरोबरच कर्नाटक राज्यातील गरीब रुग्णांना याचा लाभ होणार आहे.