Breaking News

भारताची ’फुलराणी’ सायना नेहवालचे निवृत्तीचे संकेत

मुंबई, दि. 03 -भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. गुडघ्यावरील शस्त्रक्रिया करुन परतलेली बॅडमिंटनपटू सायनाने आपली कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘ईएसपीएन’ला दिलेल्या मुलाखतीत सायनाने ही भावना व्यक्त केली आहे.
रिओ ऑलिम्पिकनंतर गुडघेदुखीने त्रस्त असलेल्या सायनावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतरही सायना बॅडमिंटन कोर्टवर परतली. पुनरागमनासाठी सायना मोठी मेहनत घेत आहे, मात्र आपल्या मनात आता करियर संपल्याची भावना निर्माण होत असल्याचे सायना म्हणाली. सायनाने भारताला ऑलिम्पिकसह अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकवला आहे.
‘जर लोकांना वाटत असेल माझी कारकीर्द संपली, तर ती आनंदाची गोष्ट आहे. सगळे माझ्याबद्दल खूप विचार करतात, मात्र आता त्यांना माझ्याविषयी विचार करावा लागणार नाही. मी  फक्त पुढच्या एका वर्षाचा विचार मी करत आहे. पुढच्या 5-6 वर्षांचे नियोजन मी इतक्यात करणार नाही.’ असा मानस सायनाने व्यक्त केला. वयाच्या अवघ्या 26 वर्षी सायनाने बॅडमिंटनला रामराम ठोकण्याचे संकेत दिल्याने चाहत्यांना चुटपूट लागून राहिली आहे. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीनंतर 20 ऑगस्टपासून तिने एकही सामना खेळलेला नाही. येत्या 15 तारखेला सायना ‘चायना सुपर सीरिज प्रिमिअर’मधून पुनरागमन करणार आहे.