Breaking News

नगर व भिंगारमध्ये गवळी बांधवाचा सगर उत्सव साजरा

। शहरातील अनेक चौकात हलगीच्या तालावर नाचल्या म्हशी । नागरिकांचे ठरले आकर्षण ।   

अहमदनगर (प्रतिनिधी) । 04 -  नगर शहर व भिंगार शहरातील गवळीसमाज बांधवांनी दीपावली पाडव्या निमित्त सगर उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला.  यावेळी गाय-म्हशी पळविण्यात आल्या.शहरातील दिल्लीगेट, सर्जेपुरा चौक येथेही हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात गवळी समाजातील नागरिकांनी  मोठा सहभाग नोंदविला. हलगीच्या तालावर नाचलेल्या म्हशी हे नागरिकांचे आकर्षण ठरले.  
अनेक पिढयांपासून सगर उत्सव भरविण्याचा मान नेहरू चौक येथील नायकु परिवारांकडे आहे. पाडव्याच्या दिवशी हा सगर भरविला जातो. योगेश अप्पा नायकु व  अभिषेक अप्पा नायकु हे टिळ्याचे मानकरी होते. सगर उत्सवात सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीला टिळा लावून पानसुपारी दिली गेली. या प्रसंगी गवळी बांधव  एकमेकांना शरणार्थ (नमस्कार) घालतात.
प्रारंभी पाच छोटी दगड घेवून त्यास जलाभिषेक करतातात विधीवत पूजन केले जाते. ही पाच दैवत म्हणजेच सगर देवता समजली जाते. ज्याच्याकडे गायी म्हशी  आहेत. तो प्रत्येक व्यक्ती या उत्सवात सहभागी होतो. गवळी समाजाप्रमाणेच इतर समाजबांधव यात मोठया उत्साहाने सहभागी होतात. यादिवशी गायी म्हशींच्या  शिंगांना रंगविले जाते. सजावट केली जाते. विशेष करून आपल्या हाकेला धावून येणारी म्हैस व रेड्यांच्या शिंगांना मोर पिसाचा तुरा रोवलेला असतो. म्हशी  पळविणारे गवळी बांधव आपली कला सादर करतात. बंटी शहापूरकर या युवकाने दुचाकीवर बसून म्हशी पळविल्या, सचिन नायकू याने काठीला घोंगडी बांधून  म्हशी पळविल्या. मारूती धजाल यांनी आपल्या खास शैलीतील आवाज काढून नाचत म्हशी पळविल्या तर त्यांच्या पुत्राने या सगरात घोडा नाचवून उपस्थितांचे  लक्ष वेधले.
सुनील राजगुरु यांनी दरवर्षीप्रमाणे ढोल ताशांच्या निनाद रेड्याची मिरवणूक काढून सगरदेवतेपुढे त्यास दर्शन घ्यायला लावले. तसेच इतरांनी देखील रेड्यांना  सजवून सगर देवेतेपुढे गुडघे टेकून दर्शन घ्याव्यास भाग पाडले. हलगीच्या तालावर म्हशी धावत असतांना इतरांना म्हशी एकत्र झाल्यातरी आपल्या मालकाचा  आवाज ओळखून त्यामागे त्या धावतांना दिसत होत्या. सजवलेले रेडे रुबाबात चालत होते. या सगरात ठकाप्पा लंगोटे, भीम लालबोंद्रे,काका खताडे, बाळू बहिरट,  राम हाथरूणकर, विष्णू घुले, सिदाप्पा तोरडी, रमेश धजाल, बाळू दहिहंडे, भरत घुले, सचीन बिडकर, यलप्पा बारशे, शंकर नायकु, अण्णा शहापुरकर, दत्ता  लंगोरे, विठ्ठल वाणी, संजय नामदे, बाळू लालबोंद्रे, राजू काटकर, मोहन लालबोंद्रे, महादु लंगोटे सहभागी झाले होते.