Breaking News

सांगलीत जनआक्रोश मोर्चा

सांगली, दि. 30 - काळ्या पैशाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणार्‍या मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाचा निषेध करीत सांगली शहर व जिल्हा काँग्रेसच्यावतीने सांगलीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. गरीब जनतेचा हाहाकार, मुर्दाबाद..... मुर्दाबाद... मोदी सरकार, विजय मल्ल्याला कर्ज माफ, सर्वसामान्यांना मोदी शाप, अशा घोषणांचे फलक हाती घेऊन काँग्रेस भवनपासून मोर्चास सुरुवात झाली. आझाद चौक, स्टेशन चौक, राजवाडा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. याठिकाणी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे की, कुठलीही पूर्वतयारी आणि पर्यायी व्यवस्था न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशभरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. लग्नकार्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढण्यासाठीही जाचक अटी ठेवलेल्या असल्याने, ही घोषणा पूर्णपणे फसवी आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा शेतीमाल पडून आहे. बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प आहेत. मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील कोट्यावधी सामान्य नागरिक बँकेच्या बाहेर रांगेत उभे आहेत. चलन बंदमुळे सर्वसामान्यांना प्रचंड मनःस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. या गोंधळामुळे देशभरात आतापर्यंत सुमारे 60 लोकांचे बळी गेले आहेत. पंतप्रधानांच्या लहरीपणामुळे देशाची अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहे. देशात आर्थिक अराजकतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीची माहिती व जनतेतील आक्रोश याबद्दल केंद्र व राज्य सरकारला अवगत करुन द्यावे व त्यावर तात्काळ योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात केली आहे.
आंदोलनात प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा पाटील, वहिदा नायकवडी, माजी आमदार हाफिज धत्तुरे, विक्रम सावंत, बाजार समिती सभापती प्रशांत शेजाळ, संतोष पाटील, नगरसेविका अनारकली कुरणे, शेवंता वाघमारे, गुलजार पेंढारी, गजानन मगदूम, सुवर्णा पाटील, जावेद शेख, धनराज सातपुते, डॉ. विक्रम कोळेकर, मिलींद दाभाडे, आय्युब निशाणदार, प्रतीक्षा सोनवणे, अशोक पवार, राजन पिराळे, तौफिक शिकलगार, पैगंबर शेख आदी सहभागी झाले होते.