Breaking News

मेढ्यात सत्ताधारी राष्ट्रवादीला धक्का; अपक्षांसह शिवसेना-भाजपचा समावेश

मेढा, दि. 30 (प्रतिनिधी) : मेढा नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला ’दे धक्का’ करीत शिवसेना-भाजपने 16 पैकी 5 जागा मिळवून नगरपंचायतीत दमदार प्रवेश केला. राष्ट्रवादी काँगे्रसला 7 तर अपक्षांनी 4 जागा जिंकल्या असून येथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मेढा नगराध्यक्षपद हे रिक्त असल्याने नगराध्यक्ष कोणाचा हे सध्या तरी अंधारीच आहे.
मेढा नगरपंचायतीच्या 17 पैकी 16 प्रभागांसाठी निवडणूक झाली. यशोदीप मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी धनाजी पाटील, जावळीच्या तहसिलदार जयश्री आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. प्रभागनिहाय मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7, शिवसेना 4, भाजप 1 व अपक्ष 4 उमेदवार विजयी झाले. यामध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँठोसचे पांडुरंग जवळ, भाजपचे पांडुरंग देशपांडे, शिवसेनेचे सतीश पंडीत, अपक्ष दत्तात्रय पवार यांनी विजय मिळवला. प्रभाग क्र. 17 मध्ये शिवसेनेचे संजय सुर्वे यांचा निसटता पराभव झाला. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारीची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.
मेढा नगरपंचायतीच्या या पहिल्याच निवडणुकीत प्रभाग क्र. 14 मधून शिवसेना पुरस्कृत म्हणून विजयी झालेली पूजा धनंजय पवार ही सर्वात कमी वयाची 23 वर्षांची असून ती सॉफटवेअर इंजिनियर आहे. उत्तम वक्तृत्व असलेली गौरी पवार मेढा नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच कमी वयाची व उच्च शिक्षीत सदस्या ठरली. तर गेली 40 वर्षे मेढा ग्रामपंचायतीवर वर्चस्व असणारे पांडुरंग (बापू) जवळ हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत.