Breaking News

नाशिक-पुण्यात थंडीने हुडहुडी, मुंबईचा पाराही घसरला

नाशिक, दि. 03 - दिवाळीआधीच नाशिकमध्ये शिरकाव केलेल्या थंडीने आता चांगलाच जम बसवला आहे. सुरुवातीला गुलाबी वाटणारी थंडी आता बोचरी होऊ लागली आहे. नाशिकमध्ये आज 11.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा गारठा इतका वाढला आहे की स्वेटर, मफलर आणि मोज्यांशिवाय घराबाहेर पडणे नाशिककरांना कठीण झाले आहे. संध्याकाळी सहा वाजल्यानंतरच वातावरणात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.
तर नाशिकपाठोपाठ आता पुण्यातही थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी स्वेटर, शाल परिधान केलेले लोक आता रस्त्यांवर पाहायला मिळत आहे. पुण्यातील आज सकाळचे तापमान 12.1 अंश सेल्सिअस इतके होते. येत्या काही दिवसात पुन्हा थंडीची लाट वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या कुडकुडत्या थंडीतही अनेक पुणेकर मॉर्निंग वॉकसाठीही मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. याशिवाय मुंबईतही तापमानाचा पारा काहीसा घसरला असून हवेत गारवा जाणवत आहे.