Breaking News

बीड, नाशिकमध्ये झेंडूची मातीमोल भावाने विक्री

बीड/नाशिक, दि. 02 - नाशिक आणि बीडमध्ये ऐन दिवाळीत शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले आहे. झेंडूची फुले एक रुपये प्रति किलो भावाने विकण्याची शेतकर्‍यांवर वेळ आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा खर्च निघणे देखील अशक्य झाले आहे.
बीडच्या रस्त्यांवर मातीमोल झालेले झेंडूचे फुले म्हणजे हे शेतकर्‍याचे सोने आहे. पण अवघा एक रुपया एक किलो दर मिळाल्याने शेतकर्‍याला हे सोने अक्षरशः  रस्त्यावर फेकून द्यावे लागले.
नाशिकच्या बाजाराचीही काही वेगळी स्थिती नव्हती. कधीकाळी किमान 50 रुपये किलोने मिळणारा झेंडू कवडीमोल झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.  यंदा टोमॅटो पडला, अतिपावसाने कांदाही सडला. त्यामुळे शेतकर्‍याने आशेने झेंडू लावला. पण अतिरिक्त उत्पादनाने त्याचा दरही रसातळाला गेला आहे. जीवापाड  जपलेल्या झेंडूला हंगामातच दर मिळाला नाही. एकाचवेळी झालेली लागवड आणि एकाचवेळी आलेलं भरघोस उत्पादन शेतकर्‍याच्या जीवावर उठले. त्यामुळे  शेतकर्‍यांनी आता स्मार्ट शेतीकडे वळण्याची गरज आहे.