Breaking News

मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत मौन सोडणार, 6 नोव्हेंबरला बाईक रॅली

मुंबई, दि. 02 - मागील तीन महिन्यांपासून. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निघणारा मराठा क्रांती मूक मोर्चा अखेर मुंबईत मौन सोडणार आहे. येत्या रविवारी 6 नोव्हेंबर रोजी सोमय्या मैदान ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी बाईक रॅली काढण्याची घोषणा मोर्चाच्या नियोजन समितीने केली आहे.
कोपर्डी बलात्कारातील नराधमांना फाशी आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन यावेळी सरकारला सादर केले जाईल,  असेही समितीने सांगितले आहे.
सोमय्या मैदानावरुन सकाळी 9 वाजता निघणारी ही बाईक रॅली सायन सर्कलहून सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळाहून थेट  छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) रेल्वे स्टेशनसमोर पोहोचेल. सीएसटीला छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिला जाईल. तसंच कोपर्डी घटनेतील  पीडितेला श्रद्धांजली वाहून रॅलीची सांगता होईल.