Breaking News

अशोक मोने सलग 35 वर्षे सातारा पालिकेचे नगरसेवक

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेता, नगरसेवक अशी विविध पदे भुषवणारे अशोक मोने यांनी ही निवडणूक जिंकून सातारा नगरपालिकेत  सलग 35 वर्ष नगरसेवक बनण्याचे रेकॉर्ड केले. कराडचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे वडील स्व. पी. डी. पाटील हे कराड नगरपालिकेचे सलग 35 वर्षे  नगराध्यक्ष होते. त्याच्यानंतर हा बहुमान मिळणारे सातारा जिल्ह्यातील ते एकमेव नगरसेवक आहेत.
प्रभाग 14 अ मधून यंदा अशोक मोने निवडून आले. नेहमीच जास्त मताधिक्क्याने निवडून येणारे मोने यंदा अवघ्या 60 मतांनी विजयी झाले. यापूर्वी सर्वात प्रथम  सन 1985 मध्ये त्यांनी या वॉर्डमधून अवघ्या 18 व्या वर्षी निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून ते आजतागायत 1985 नंतर 1991, 1996, 2001, 2006,  2011, व यंदाची 2016 या सर्व निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून नेहमी विजयी झाले. सन 1996 मध्ये त्यांना नगराध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळाली.  तसेच सन 2001 मध्ये विरोधी पक्षनेते पदी काम करण्याची संधी मिळाली.
नविआच्या 12 नगरसेवकांमध्ये सर्वात अनुभवी तेच आहेत. आता  पुन्हा विरोधी पक्षनेता म्हणून अशोक मोने यांच्यावर जबाबदारी सोपावण्यात येणार असल्याची  चर्चा आहे.