Breaking News

ऐन सीझनमध्ये फ्लिपकार्टच्या सीएफओंचा राजीनामा

नवी दिल्ली, दि. 26 - फ्लिपकार्टचे चीफ फायनन्शियल ऑफिसर संजय बवेजा यांनी ऐन सीझनच्या तोंडावर राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता बवेजा यांच्या जागी लवकरात लवकर दुसरा अधिकारी नेमणे कंपनीसमोर मोठे आव्हान असणार आहे. बवेजा या वर्षाच्या अखेरपर्यंत फ्लिपकार्टला रामराम ठोकणार आहेत. मात्र फ्लिपकार्ट सध्या स्पर्धक कंपनी अमेझॉनला टक्कर देत आहे. त्यातच आर्थिक विभागाच्या अधिकार्‍याचा राजीनामा फ्लिपकार्टसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
बवेजा यापूर्वी टाटा कम्युनिकेशन्समध्ये सीएफओ पदावर कार्यरत होते. त्याअगोदर बवेजांनी एमार आणि एअरटेलमध्येही काम केलं आहे. दोन वर्षांपूर्वी बवेजांना फ्लिपकार्टच्या सीएफओपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यापूर्वी देखील फ्लिपकार्टचे कॉमर्स हेड मुकेश बंसल आणि चीफ बिझनेस ऑफिसर अंकित नागोरी यांनी एकत्रपणे राजीनामा दिला होता. त्यानंतर कंपनीचे उपाध्यक्ष मनिष माहेश्‍वरी यांनी एप्रिलमध्ये राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीचे लीगल हेड राजेंद्र शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 10 महिन्यातच राजीनामा दिला होता.