Breaking News

एसीबीकडून नैसर्गिक न्यायाला वाटाण्याच्या अक्षता

सार्वजनिक बांधकाम : पाटील-सोनवणे प्रकरणात संशयीतावर मेहेरनजर; तळीरामाची चौकशी करण्याची मागणी

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 21 - ठेकेदाराची मंजूर देयके अदा करण्यासाठी लाच मागणारा कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांच्याविरूध्द भक्कम पुरावा असतांना एसीबीने त्यांच्यावर असलेले आरोप फेटाळून प्रकरण निकाली काढणे हे आठवे आश्‍चर्य मानले जात आहे. तर दुसर्‍या बाजुला नाशिकचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांच्यातील तळीरामही साबांप्रशासनात चर्चेचा विषय बनला आहे.
पुर्वी साबांत धनंजय धवड आणि उल्हास देबडवार ही जोडी कुप्रसिध्द ठरून चर्चेत होती. विद्यमान परिस्थितीत कार्यकारी अभियंता किशोर पाटील आणि अधिक्षक अभियंता रणजीत हांडे कुप्रसिध्दीच्या झोतात आहेत. दोघांच्याही कुप्रसिध्दीचा केंद्रबिंदू एकच.
साबांची निविदा प्रक्रिया राबविण्यापासून कार्यारंभ, कार्योत्तर आदेश, गुणवत्ता पडताळणी अहवाल, ठेकेदारांच्या देयकांना मंजूरी देतांना आणि मंजूर देयकं अदा करतांना शासन नियमावली आणि वेळोवेळी जारी झालेले परिपत्रकाला पायदळी तुडवून अनियमितता हाच किशोर पाटील आणि रणजित हांडे यांचा पिंड आहे. जो ठेकेदार लाच देईल त्यालाच ही मंडळी इन्टरटेन करतात. अशाच प्रकारे मुंबई शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी तब्बल 98 कोटींची देयके रोखुन धरली होती. किशोर पाटील यांच्या या कुटनितीचे चटके बसलेले मजूर संस्थेचे ठेकेदार अशोक सोनवणे यांनी यासंदर्भात एसीबीकडे तक्रारही दाखल केली होती. लाच देण्याघेण्यासंदर्भात किशोर पाटील आणि अशोक सोनवणे यांच्या दरम्यान झालेले भ्रमणध्वनी संभाषण पडताळल्यानंतर एसीबी दि. 15 मार्च 2013 रोजी एसीबी या तक्रारीत तथ्य असल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत आली होती. त्यानंतर दि. 15, 16 व 17 मार्च 2013 हे तिन दिवस एसीबीने या तक्रारी संदर्भात आणखी परिस्थितीजन्य पुरावे मिळविले आणि किशोर पाटील यांनी अशोक सोनवणे यांच्याकडे लाच मागितली याविषयी खात्री झाल्यानंतरच दि. 17 मार्च 2013 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 प्रमाणे किशोर पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
त्यानंतर चौकशी प्रक्रियेत किशोर पाटील यांनी हितसंबंध वापरून एसीबीला आपल्या जाळ्यात खेचले. कुठे माशी शिंकली हा संशोधनाचा विषय असला तरी नंतरच्या घडामोडींनी फिर्यादीला नैसर्गिक न्याय मिळवून देण्यासाठी तपास होण्याऐवजी संशयिताला फायदा मिळेल या दिशेने तपास सुरू असल्याचे निदर्शनास आणले. फिर्यादींनी या प्रकरणाच्या स्थिती बद्दल जेंव्हा जेंव्हा एसीबीच्या तपास यंत्रणेकडे विचारणा केली तेंव्हा तेंव्हा उत्तर टाळण्यात आले किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली गेली. फिर्यादीला अंधारात ठेवून किशोर पाटील यांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न एसीबीच्या तपास यंत्रणेने केला असा आरोप तक्रारदार अशोक सोनवणे यांनी केला आहे. वास्तविक अशोक सोनवणे यांच्याप्रमाणे अनेक ठेकेदारांना साबांतील या लाचखोर प्रवृत्तींची झळ बसली आहे. ज्या ठेकेदारांनी लाच दिली त्यांची देयके विनाविलंब अदा करण्यात आली. या पापकर्मात किशोर पाटील यांच्यासोबत साबांचा तळीराम नाशिकचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांचाही लांडग्याचा वाटा आहे. 98 कोटीतील अनेक ठेकेदारांची देयके लाच घेऊन या तळीरामने चुकते केले आहेत. मुंबई शहर इलाखा विभागातून बढतीवर नाशिक साबामंडळात अधिक्षक अभियंता म्हणून पदभार स्वीराकरल्यानंतर रणजीत हांडे यांनी आपली स्वभावकुळी तिच आहे याची प्रचिती देणे सुरू ठेवले आहे. नेहमीच मानसिक तणावाखाली वावरणारे तळीराम रणजीत हांडे यांनी स्थानिक कंत्राटदारांना डावलून आयात ठेकेदारांना झुकते माप देत लतखोरीचे ऋणानुबंध जपण्यातच स्वारस्य दाखविले आहे. थोडक्यात किशोर पाटील आणि रणजीत हांडे यांची पुन्हा सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याची मागणी केली जात आहे.