Breaking News

कॅगचा ठपका अन् लोकमंथनचा पाठपुरावा यशस्वी

अधिक्षक अभियंता राजेंद्र जवंजाळ अखेर सक्तीच्या रजेवर

मुंबई, विशेष/प्रतिनिधी, दि. 21 - कॅगने ठेवलेला ठपका आणि लोकमंथनने सातत्याने केलेला पाठपुरावा याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र जवंजाळ यांना शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे विश्‍वसनीय वृत्त हाती आले आहे. दरम्यान किशोर पाटील, रणजीत हांडे हेही सुपात असल्याचे समजते.
कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असतांना राजेंद्र जवंजाळ यांनी केलेली अनियमितता या आदेशाला कारणीभूत ठरली आहे. सायन पनवेल विशेष राज्यमार्ग व ठाणे जिल्ह्यातील चिंचोटी ते अंजुरफाटा, अंजूरफाटा ते मानकोली या राज्यमार्गाच्या खाजगीकरण कामाच्या निविदा प्रक्रियेत केलेली अनियमितता जवंजाळ यांना भोवली आहे.
सन 2008 मध्ये या राज्यमार्गाच्या चौपदरीकरण कामाची 98 कोटींची निविदा मंजूर झाली होती. त्यावेळी कार्यकारी अभियंता होते राजेंद्र जवंजाळ. प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईपर्यंत कामाचा अंदाजीत खर्च 120 कोटी 51 लाखपर्यंत पोहचविण्यात आला. राजेंद्र जवंजाळ यांनी आपल्या पद-अधिकाराचा बेकायदेशिर वापर करून मर्जीतील कंत्राटदारांच्या लाभात ही निविदा प्रक्रिया राबविली. कामाचे तुकडे पाडणे, एका विशिष्ट आणि मर्जीतील कंत्राटदाराला फायदा व्हावा म्हणून प्रत्यक्ष निविदा वाटप प्रक्रियेदरम्यान जाणीवपूर्वक गैरहजर राहणे अशा प्रकारे राजेंद्र जवंजाळ यांनी शासनाची दिशाभूल केली, फसवणुक केली. निविदा प्रक्रियेत अन्याय झालेल्या कंत्राटदार कंपनीने वेळोवेळी शासनाला या अनियमिततेविषयी अवगत केले होते. तथापि लागोबांधे असल्यामुळे जवंजाळ यांच्यावर कारवाई झाली नाही. अखेर कॅगकडे तक्रार झाल्यानंतर खर्‍या अर्थाने या अनियमिततेला वाचा फुटली. विशेष म्हणजे साबांप्रशासनाने या प्रक्रियेत दोषी असलेल्या राजेंद्र जवंजाळ यांची चौकशी करण्यासाठी राजेंद्र जवंजाळ यांचीच नियुक्ती करून मोठा खेदजनक विनोद केला होता..
कॅगने या सर्व आक्षेपार्ह बाबी नोंदवत गंभीर दखल घेतली होती. या सर्व घडामोडींवर लोकमंथनने सुक्ष्म नजर ठेवत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला अखेर प्रशासन यंत्रणेतील भ्रष्ट प्रवृत्तींवर मात झाली. राजेंद्र जवंजाळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश शासनाने दिला. जवंजाळ यांच्यासारख्या अनेक भ्रष्ट प्रवृत्ती साबांत कार्यरत आहेत. त्यांच्यावरही कायद्याच्या चौकटीत कारवाई व्हावी म्हणून लोकमंथन दक्ष आहे. जवंजाळ यांच्यानंतर कुणाचा नंबर लागणार याविषयी साबांत सुरू असलेल्या चर्चेत किशोर पाटील आणि रणजीत हांडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.