Breaking News

गुन्हेगारांच्या विळख्यात राजकीय पक्ष !

दि. 21, ऑक्टोबर -विकासाचे दावे करणारे, भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक सरकार देण्याचा दावा करणारे विद्यमान सरकार आज वेगळयाच कारणांनी चर्चेत आहे. आपल्या स्वपक्षात गुंडांना प्रवेश देवून आपल्याला नैतिक-अनैतिकतेची कसलीच चाड नसल्याचा प्रत्यय भाजपाकडून देण्यात आला आहे. राज्यभर गुंडगिरीचा वारू चांगलाच बोकाळला आहे. मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्त्यांची झालेेली हत्या असेल, किंवा राज्यभर आया-बहिणींच्या इज्जतीचा प्रश्‍न असेल. किंवा खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्हयातच गुंडगिरीने मांडलेला उच्छाद असेल. राज्यभर कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असतांना, त्यात त्यांनी हिमालयाचे अतिउंच टोक गाठले आहे. राज्यातील राजकारणाचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण सुरू झाले आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुंडांना पक्षात घ्यायचे, जेलमधील  गुंडांना पॅरोलवर बाहेर काढायचे आणि वापर झाल्यानंतर त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवायचे असे पूर्वीचे धोरण पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाले आहे. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी न वापरता सत्तेला टिकविण्यासाठी सर्वच मार्गाचा वापर विद्यमान सत्ताधार्‍याकडून करण्यात येत आहे. राज्यातील कोणत्याच पक्षाला गुन्हेगारी वर्ज्य नसल्याचे आजमितीस तरी दिसून येत आहे. एकेकाळी आजचे सत्ताधारी विरोधी पक्षात असतांना सत्ताधार्‍यांनी आपल्या पक्षात गुन्हगांराना प्रवेश दिला म्हणून तुटून पडायचे, आणि आज पुन्हा तेच आपल्या पक्षात उजळमाथ्याने गुन्हेगारांना प्रवेश देत असल्याचे दिसून येत आहे. कुख्यात गुंड बाबा बोडके आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे तर राजकीय वर्तुळासह विधि माध्यमांमध्ये जोरदार चर्चा आहे. गुन्हेगारीला मोडून काढण्याची भाषा करणारे आज गुंडासोबत दिसत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे काही आता नवे राहिले नाही. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष गुंडापुंडाचा आधार घेऊन राजकारण करण्याचे दिवस संपलेले नाही ते आजही सुरू आहे. वास्तविक विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसले की कोणतेही बेछूट आरोप करणे अगदी सोपे असते. मात्र विरोधक जेव्हा खुर्चीवर बसतात तेव्हा त्यांना नक्कीच मर्यादा येतात. सातार्‍यातील एका सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कान्ह्या घोलप या गुंडाने जाहीरपणे प्रवेश केल्याने त्यांनाही टीकेचे धनी व्हावे लागले. राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. लोकशाहीला आपल्या सोयीसाठी वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे.राजकीय पक्षांनी तर गुन्हेगारांच्या चारित्र शुद्धीकरणाचा नवा पायंडाच सुरू केला आहे. त्यामुळे कुख्यात म्हणून गणले जाणारे पुण्यातील गुन्हेगार आता खादीचे पांढरे शुभ्र कपडे परिधान करून समाजात ताठ मानेने वावरत आहेत. कधीकाळी नंग्या तलवारीच्या पातींच्या आधारे पाहिजे ते मिळवणार्‍या अशा कार्यर्कत्यांमुळे राजकारणाचा मुखडा गुन्हेगारीचा होऊ लागला आहे. राजकारणात टिकून राहायचे असेल, तर गुन्हेगार हाताशी असलेच पाहिजेत, असा समज राजकीय पक्षांनी करून घेतला आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. एकंदरित पुण्यातील राजकीय पक्षांचा बदललेला दृष्टिकोन पहिला, तर राजकारणात कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नसतो, हे प्रत्येकाने कृतीतून दाखवून दिले आहे. गुन्हेगारांच्या या विळख्यातून राजकीय पक्षांची सुटका होईल का, हा यक्षप्रश्‍न् आहे.