Breaking News

मानगुटीवर बसून वसूल केलेल्या देणगीची सैन्याला गरज नाही: पर्रिकर

नवी दिल्ली, दि. 25 -  एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, असं म्हणत, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या रिलीजप्रकरणी सगळ्यांनाच खडे बोल सुनावले आहेत.
भारतीय नौदलाच्या कमांडर कॉन्फ्रन्सचं उद्घाटन करताना पत्रकार परिषदेत पर्रिकर बोलत होते. चार दिवस चालणार्‍या या संम्मेलनात नौदलाच्या तयारीचा आढावा पर्रिकरांनी यावेळी घेतला.
‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे याच्या प्रदर्शनाला मनसेने तीव्र विरोध केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करुन चित्रपट निर्माते करन जोहर, मुकेश भट्ट आणि राज ठाकरेंची वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. तासभराच्या बैठकीनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंनी सशर्त परवानगी दिली. यावेळी राज ठाकरेंनी चित्रपटाच्या उत्पन्नामधील 5 कोटी रुपये आर्मी वेल्फेअर फंडात जमा करणे, तसेच पाकिस्तानी कलाकारांना यापुढे कोणत्याही चित्रपटात काम देणार नाही, असे आश्‍वासन मागितले होते.
यातील मुख्य तीन मागण्या निर्मात्यांनी मान्य झाल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवर चोहूबाजूने टीका होऊ लागली. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. त्यातच चित्रपटाच्या उत्पन्नातील 5 कोटीची देणगी लष्कराने नाकारल्यानंतर आता, संरक्षण मंत्र्यांनीही याला विरोध केला आहे. पर्रिकर म्हणाले की, उद्या एखाद्याला सैन्यासाठी निधी द्यायचा असेल, तर देऊ शकतो. मात्र, मदत ही ऐच्छिक असावी, कोणाच्या मानगुटीवर बसून जबरदस्तीने घेतलेल्या देणगीची सैन्याला गरज नाही.