Breaking News

ट्रान्सपोर्ट अधिकार्‍याच्या घरातून कुबेराचा खजिना जप्त

हैदराबाद, दि. 25 - आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यातील एका ट्रान्सपोर्ट अधिकार्‍याच्या घरातून चक्क कुबेराचा खजिनाच जप्त करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत या आधिकार्‍याच्या घरातून 14 फ्लॅटची कागदपत्रे, एक दाल मिल, 60 किलो चांदी, एक किलो सोने आणि 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या आधिकार्‍याच्या फक्त एकाच घरावर छापा टाकण्यात आला आहे. त्याने आपल्या 34 वर्षांच्या सेवेत यापेक्षा अधिक संपत्ती जमा केली असल्याची शक्यताही अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
पूर्णचंद्र राव (वय.55) असे या ट्रान्सपोर्ट अधिकार्‍याचे नाव असून, 1981 साली मोटार व्हेईकल इन्सपेक्टर पदावरुन आपली कारकीर्द सुरु केली. आंध्र प्रदेशमधील गुंटूर, ऑन्गोल आणि नेल्लोर आदी ठिकाणी त्यांनी काम केले. पूर्णचंद्रांच्या बेहिशेबी मालमत्तेमध्ये विनूकोंडामध्ये सात फ्लॅट आणि दोन घरे, गुंटूरमध्ये एक घर, हैदराबाद आणि विजयवाडामध्ये प्रत्येकी दोन-दोन फ्लॅट, तसेच विनूकोंडामधील एक दाल मिलचा समावेश आहे. पूर्णचंद्र रावने आपल्याकडे एकूण संपत्ती तीन कोटी असल्याचा दावा केला असून, अ‍ॅन्टी करप्शन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या संपत्तीचे बाजरी मूल्य 25 कोटी रुपये आहे. दरम्यान पूर्णचंद्र राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.