Breaking News

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत चिंचवडे व गुरव यांचा पक्षात प्रवेश

पुणे, दि. 20  - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर काही दिवस शांत झालेले शहरातील राजकीय वातावरण आता  तापण्यास सुरूवात झाली आहे. 
भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या रांगेत असलेले शहरातील दिग्गज आता पक्षांतरासाठी सज्ज झाले आहेत. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब  दानवे यांच्या उपस्थितीत चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गुरव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन चिंचवडे यांनी बुधवारी (दि. 19)  पक्षात प्रवेश केला. दानवे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी बुधवारी भेट दिली. त्यावेळी  पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, सरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, नगरसेवक शीतल शिंदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा  शैला मोळक, कांता मोंढे, उमा खापरे, माजी नगरसेवक अमर मूलचंदानी, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना व आरक्षण निश्‍चित झाले. त्यानंतर शहरातील राजकीय वातावरण थोडेसे शांत झाले होते. आजी व माजी नगरसेवक  तसेच निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेले इच्छुक कोणता प्रभाग आणि कोणता राजकीय पक्ष सोयीचा होईल, याची चाचपणी करत होते. त्यात  बहुतांश इच्छुकांना भाजप हा पक्ष सोयीचा वाटू लागला आहे. त्यामुळे अनेकजण भाजप प्रवेशाचा मूहूर्त शोधत आहेत. प्रवेशाची पहिली सुरूवात पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली.
रावसाहेब दानवे हे बुधवारी शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी आले होते. त्यावेळी चिंचवड येथील सामाजिक  कार्यकर्त्या माधुरी गुरव आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सचिन चिंचवडे यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी या  सर्वांचे पक्षात स्वागत केले.