आरोपी भैलुमेचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
। अपीलासाठी मुदत देण्याची आरोपीच्या वकीलाची मागणी । पुढील सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार ।
अहमदनगर (प्रतिनिधी)। 21 - कोपर्डी खटल्यातील तीनही आरोपींवर कट, अत्याचार व खुनाचा आरोप ठेवण्यात यावा, असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्यावतीने बुधवारी न्यायालयासमोर करण्यात आला. या युक्तीवादानंतर या घटनेतील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष मवाळ, व नितीन भैलुमे या तिघापैकी आरोपी नितीन भैलुमे याने वकीलामार्फत या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, व जामीन मिळावा, असा अर्ज केला होता. सदर अर्जावर गुरुवारी सरकारी पक्षाचे विशेष वकील उज्वल निकम व आरोपी भैलुमे याचे वकील प्रकाश आहिर यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद केला. युक्तीवादानंतर न्यायालयाने दोषातून वगळावे, असा अर्ज फेटाळला. त्यानंतर भैलुमे याच्या वकीलाने अपीलात जाण्यासाठी मुदत देण्याची मागणी न्यायालयासमोर केली. न्यायालयाने 27 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.आरोपी नितिन भैलुमे याच्या वकीलाने न्यायालयासमोर पाच मुद्दे मांडले. यात प्रामुख्याने पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये कटाचा अर्ज ठेवलेला नाही. त्यामुळे त्याच्यावर कटाचा आरोप ठेवता येणार नाही. आरोपी भैलुमे हा सुशिक्षीत असून तो सेड्युल्ड जातीचा आहे. सदर गुन्हा आरोपी जितेंद्र शिंदे याने केला आहे यामध्ये आरोपी भैलुमेचा संबंध नाही. तसेच घटनास्थळाजवळील रस्त्यावरुन दुचाकीवर फिरत होते.याची कोणतीही वेळ नाही. याचा कोणताही उल्लेख नाही, असे न्यायालयासमोर विशद केले. आरोपीच्या वकीलानंतर अॅड.उज्वल निकम यांनी आरोपीच्या वकीलाचे मुद्दे युक्तीवादात खोडून काढले. युक्तीवाद करतांना ते म्हणाले कोपर्डी खटला हा, संवेदनशील खटला आहे. आरोपीच्या वकीलांनी सत्य पुरावे न्यायालयासमोर सादर करावेत, तेढ वाढेल, अशी वक्तव्य न्यायालयात करु नये. खटला संवेदनशील असल्याने न्यायालयातील हॉलमध्ये काही व्यक्ती मोबाईलवर रेकॉर्डींग करत असल्याचे निदर्शनास आले. त्याचा गैरवापर होवू शकतो असे ही विशद केले.
पोलिसांकडून आरोप ठेवणे यासाठी प्राथमिक पुरावा गोळा करुन ते ठेवले जातात. त्याची चिरफाड केली जात नाही. पोिलिसांनी गोळा केलेला पुरावा सकृतदर्शनी विचारात घेतले जातात. पोलिसांचा पुरावा गुणवंतेवर बोलतांना अॅड. निकम म्हणाले पिडीत मुलगी व तिची मैत्रिण घरी येत असतांना आरोपी जितेंद्र शिंदे याने छेडछाड केली होती. यावेळी पिडीत मुलीने आरोपी शिंदे याला ढकलले होते. त्यावेळी आरोपी मवाळ व भैलुमे यांनी त्याची खिल्ली उडवून आरोपी शिंदे याला सांगितले आता नको, आपल काम तिला नंतर दाखवू, आपल या शब्दावर अॅड. निकम यांनी जोर दिला. गुन्ह्यातील तिघांच्या सदर विधानानंतर पिडीत मुलगी घाबरली. व ती शाळेत गेली नाही. त्याचे रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात आले. अॅड.आहिर यांच्या अर्जावर प्रतिवाद करतांना अॅड.निकम म्हणाले की, फिर्यादीनुसार कोपर्डीतील घटना ही सायंकाळी 7.30 नंतर झाली आहे. यातील आरोपी मवाळ व भैलुमे यांच्या टेहळण्याची वेळ अगोदर आहे. तिघा आरोपींविरुध्द भरपुर पुरावे सादर करण्यात आले. न्यायालयाने सर्व कागदपत्रांची व युक्तीवादानंतर दोषमुक्त करण्याचा अर्ज फेटाळून लावला.
अर्ज फेटाळल्यानंतर आरोपी नितीन भैलुमे यांच्या वकीलाने अपीलासाठी मुदत देण्याची मागणी न्यायालयासमोर केली. न्यायालयाने मागणी मान्य करुन पुढील सुनावणी 27 ऑक्टोबर रोजी होईल, याच वेळी आरोपी नितीन भैलुमे यांचे वकील त्याच्या जामीनासाठीचा अर्ज देण्याची शक्यता आहे. त्यानंतर नोव्हेंबरपासून सदर खटल्याची सुनावणी रेग्युलर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खटला सुरु होण्यापुर्वीच गुन्ह्यातील आरोपी नितीन भैलुमे याने, गुन्ह्यातील आरोपातून दोषमुक्त करावे, असा अर्ज केल्याने न्यायालयात दोषारोप निश्चित करण्यात आले नाही. या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोपर्डी अत्याचार व खुन प्रकरणाची सुनावणी बुधवारपासून (दि.19) येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश सौ.सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरु झाली आहे.
