कृष्णा काठावर मराठा भगव्याचे विराट गर्दीचे दर्शन
आतापर्यंतच्या मोर्चाचे विक्रम मोडले ः शहरात उत्स्फूर्त बंद
सांगली, दि. 28 - कृष्णा तिरावर मराठा बांधवांच्या एकजुटीचा महापूर लोटला. मराठा क्रांती मूक मोर्चाने अवघा परिसर भगवामय झाला होता. मंगळवारी सकाळी सुरु झालेली भगवी लाट मिरज रस्त्यावरुन राम मंदिर पर्यंत जनसागराने विराट गर्दीचे दर्शन घडविले. हा ऐतिहासिक मोर्चा आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढणारा ठरला. संपूर्ण शहराच्या कानाकोपर्यातील संपूर्ण गल्ली बोळातून उत्स्फूर्त बंद पाळला.कोपर्डी बलात्काराचा निषेध आणि मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी निघालेला हा मोर्चाचे संयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. सकाळपासूनच जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातून व शेजारच्या जिल्ह्यातील गावातून लोक सांगलीत येऊ लागले. अर्थात एरव्ही मोर्चा म्हटले की गोंधळ व घोषणाबाजी असायची. परंतु आज त्याचा कुठेही लवलेश आजच्या मोर्चाला येणार्या लोकांमध्ये जाणवला नाही. येणार्या लोकांच्याच्यात शिस्त दिसून आली. येणार्या लोकांच्या हातात भगवा ध्वज, भगवे फेटे, तसेच मराठा क्रांती मोर्चा रेखाटलेल्या भगव्या टोप्या डोकीवर घातलेल्या होत्या.
प्रशासनाने नियोजन केल्याने शहराकडे प्रत्येक दिशेने येणार्या रस्त्यावरील वाहनांसाठी पार्किंग कुठे आहे याचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे गडबड - गोंधळ झाला नाही. मिरज रस्त्यावरील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाचा प्रारंभ सकाळी 11 वाजता झाला. तेथून सांगलीकडे मोर्चा आला. राममंदिरजवळ मोर्चा अडविण्यात आला. तेथून पाच युवतीनी येऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले. कोपर्डीतील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे आदी प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मोर्चाच्या सुरुवातीस युवती-महिला भगवे झेंडे, फेटे - टोप्या घालून सहभागी झालेल्या होत्या. त्यानंतर डॉक्टर, वकील, सर्वपक्षीय नेते, लोक प्रतिनिधी, कार्यकर्ते, युवक सहभागी झाले होते. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी, क्रीडा-कला क्षेत्रातील मराठा समाज बांधव सहभागी झालेले होते. शहरातून अभूतपूर्व मोर्चा निघणार असल्याने शहरातील पालिकेच्या 37 शाळा बंद होत्या. मोर्चाने आजपर्यंतचे रेकॉर्ड मोडले असून 15 लाखावर लोक मोर्चात सहभागी झाल्याचा दावा संयोजकांनी केला आहे.
आपत्कालीन व्यवस्थापक चोख
मोर्चाचा समारोप राममंदिरजवळ तीन मुलींच्या भाषणांनी करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे मोर्चात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. शहरातील चौका-चौकात पोलिस ठेवले होते. बंदोबस्तासाठी बाहेर जिल्ह्यातूनहि पोलिस मागविले होते.