Breaking News

महिला बचतगटांचे बळकटीकरण करा : डॉ. देशमुख

सातारा, दि. 28 (जिमाका) : महिला बचतगटांच्या समस्या जाणून घ्या, त्यांना प्रशिक्षण देवून गावागावांत महिला बचतगटांचे बळकटीकरण करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
महिला आर्थिक विकास महामंडळ राबवित असलेल्या तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण प्रकल्पाची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन. एल. थाडे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संग्राम शिंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते.
कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करुन यामध्ये लोकसंचलीत साधन केंद्र न्याय गटांची व गावांची माहिती गाव पातळीवर प्रशिक्षण घेण्यात आलेली प्रशिक्षणे, लघुवित्त पुरवठा, सुक्ष्म उपजिवीका आराखडा तपशील, लक्षी मुक्ती योजनेचा आढावा आणि उपजिवीका विकास व बाजारपेठ आदींबाबत माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, काही गावांमध्ये बचतगट कमी स्थापन झाले. याबाबत आढावा घ्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या त्याचबरोबर अस्तित्वात असणार्‍या बचतगटांना प्रशिक्षण द्या. चांगल्या उत्पादीत मालाला कायमस्वरुपी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करा. लक्षीमुक्ती योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सुचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्या.