Breaking News

कोकणाला जगातील सर्वोत्तम पर्यटनाचे स्थान बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 29 : समुद्रकिनारा, गडकिल्ले, जंगले, डोंगरदर्‍या, नागमोडी वाटा व निसर्गाचे  मनमोहक सौंदर्य  यामुळे कोकण हे पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. ते जगातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ व्हावे यासाठी स्वतंत्र पर्यटन संचालनालय व महामंडळासह राज्य शासनाकडून सर्व सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
कोकण पर्यटन उद्योग संघ आयोजित ‘कोकण पर्यटन व्हिजन परिषद 2016’ च्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, बंदरे विकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रविण दरेकर, आशिष शेलार, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, कोकण पर्यटन उद्योग संघाचे अध्यक्ष माधव भंडारी, सरचिटणीस संजय यादवराव, कोकणातील पर्यटक व्यावसायिक आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाच्या नवीन कोकण पर्यटन विकास धोरणामुळे कोकणात पर्यटन व्यवसायामध्ये मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. स्वतंत्र कोकण पर्यटन महामंडळाची स्थापना, स्वतंत्र पर्यटन संचालनालय व 3 हजार कोटींचा पर्यटन विकास आराखडा हे महत्त्वपूर्ण निर्णय कोकणाच्या पर्यटन विकासासाठी घेतले आहेत. यातूनच कोकणाला जगातील सर्वोत्तम पर्यटनाचे स्थान बनविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
पर्यटन उद्योग हा सर्वात जास्त रोजगार देणार उद्योग आहे. त्यादृष्टीने या क्षेत्राकडे पाहिले जात आहे. कोकणातील पर्यटनासाठी सर्व पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे. कोकणात आलेल्या पर्यटकाला कोकणात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोकणात ‘सी वर्ल्ड इंडिया’ हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे राबविण्यात येणार आहे. कोकणातील 50 गावांचा पर्यटन विकास आराखडा कोकण पर्यटन विकास संघाने सादर करावा. त्याला शासन सर्वतोपरी मदत करील. कोकणात पर्यटनाला मोठी चालना देणार असून त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खाजगी  क्षेत्राच्या सहकार्याने  पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाईल. कोकण पर्यटन उद्योग संघाने पर्यटक व्यावसायिक व शासन यांच्यात समन्वयाची भूमिका पार पाडावी, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण पर्यटन विकास संघाचे अध्यक्ष माधव भंडारी यांनी केले तर सूत्रसंचालन संघाचे सरचिटणीस संजय यादवराव यांनी केले. कोकण पर्यटन विकास संघाच्या वतीने कोकणातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्वाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोकण ग्रीन लाईफ पोर्टल व कोकण ग्रीन लाईफ बसचे उद्घाटन करण्यात आले. तसेच जागतिक पर्यटन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल व गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी मनोगत व्यक्त केले.