Breaking News

तासगांवात डेेंग्युचे दोन रुग्ण

तासगांव, दि. 12 -  तासगांवमध्ये पुणदी रोड परिसरात राहणार्‍या दोघांना डेंग्यूंची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, ओघळीत साचलेल्या पाण्यामुळे व पालिका प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे ही साथ फैलावत असल्याची नागरिकांमधून तक्रार होत आहे. पुणदी रोड परिसरात मोठी ओघळ आले. या ओघळीत काही महिन्यांपूर्वी स्वच्छतेसाठी चर काढून पाणी पुढे नेण्याचे काम सुरु करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह नगरसेवकानी स्वतः उभारुन या कामास सुरुवात करुन दिली होती. दरम्यानच्या काळात पाऊस सुरु झाल्याने हे काम निम्म्यावर सोडून देण्यात आले. यानंतर पाऊस थांबल्यानंतर नागरिकांनी स्वच्छता करण्याबाबत सेच या चर्‍यांमधून साठलेले पाणी पुढे सोडण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र पालिका कर्मचार्‍यांनी याबाबत कोणतेही गांभीर्य न घेता चालढकल केल्याने पाणी साचून राहिले. महिना, दीड महिना झाला तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याने पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूच्या डासांची निर्मिती झाल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक सर्वे करण्यात आला, मात्र पालिकेकडून या ओघळीबाबत अद्याप कोणतीच हालचाल नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.