दहशतवादाचा सामना करण्याचा भारत-अफगाणिस्तानचा निर्धार !
नवी दिल्ली : दक्षिण आशियाला दहशतवाद मुक्त करण्याच्या निर्धारासह भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान प्रत्यार्पण करार आणि एकमेकांच्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्याच्या कायदेशीर सहकार्याच्या तीन करारांवर स्वाक्ष-या करण्यात आल्या. भारत दौ-यावर असलेले अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली.
दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटद्वारे दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या कराराला मंजुरी दिली होती. अफगाणिस्तानच्या विकासाला गती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भारताकडून अफगाणिस्तानला एक अब्ज डॉलर रुपयांचे अर्थसाह्य करण्याची घोषणाही करण्यात आली.
