कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ क्रिस्टल दांडिया रद्द
औरंगाबाद, दि. 28 - औरंगाबाद- नवरात्र महोत्सवानिमित्त मागील 15 वर्षांपासून आम्ही आर.आर.पाटील फाऊंडेशनच्यावतीने क्रिस्टल स्वर विहार रास दांडियाचे आयोजन करीत आहोत. परंतु कोपर्डी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही यावर्षी क्रिस्टल स्वर विहार रास दांडिया रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आर.आर.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विनोद पाटील म्हणाले की, कोपर्डीत आमच्या बहिणीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण समाज दु:खात आहे. ती चिमुरडी आमच्या कुटुंबापैकीच एक होती, असे आम्ही मानतो. घरातील कुणाचे निधन झाले तर सुतक पाळण्याची आमची परंपरा आहे आणि सुतकात कोणतेही सण-उत्सव आम्ही साजरे करीत नाहीत. एकीकडे समाज दु:खात असताना दुसरीकडे आम्ही सण साजरे करणे, रास दांडिया खेळणे म्हणजे आमच्या कोपर्डीतील भगिनीची अवहेलना करण्यासारखेच आहे असे आम्हाला वाटते. दांडिया रद्द करण्यामागे कोपर्डी घटनेचे दु:ख हा तर एक महत्वाचा भाग आहेच. दुसरे म्हणजे या घटनेच्या निमित्ताने राज्यातील सर्वच समाजाच्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही एरणीवर आला आहे. कोपर्डी घटनेनंतर महिला, मुलींमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. नवरात्र हा महिलांचा सण. रास दांडिया खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता-भगिनी येत असतात. आजघडीला राज्यात आमच्या मात-भगिनी घराबाहेर पडल्यानंतर परत सुरक्षित घरी येतील, याची शास्वती राहिलेली नाही. महिलांमध्येच अशी भावना दिसून येत आहे. राज्य शासन हे महिलांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम दिसत नाही. अशा या असुरक्षिततेच्या वातावरणात रास दांडिया घेणे आम्हाला उचित वाटत नसल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. कोपर्डी घटनेला तीन महिने उलटत आले आहे. अद्यापही हे शासन आणि तपास यंत्रणा चार्जशिट दाखल करू शकलेली नाही. जोपर्यंत आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही, तिच्या नराधम मारेक-यांना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंतचा काळ समाजासाठी सुतकाचाच काळ आहे, ज्या दिवशी तिच्या मारेक-यांना शिक्षा मिळले तेव्हाच आमचे सुतक फिटेल असेही विनोद पाटील म्हणाले. त्यामुळे अशा या दु:खाच्या काळात इतरांनीही आमच्या या निर्णयाचा माणुसकीच्या भावनेतून विचार करावा अशी अपेक्षा देखील विनोद पाटील यांनी व्यक्त केली.