Breaking News

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांविरूद्ध गुन्हा दाखल

शिवक्रांती युवा सेनेचे संस्थापक संजय सावंत यांची तक्रार

औरंगाबाद, दि. 29 - अनेक दिवसांपासून महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या वतीने कोपर्डीच्या निषेधार्थ मुक मोर्चे काढण्यात येत आहेत. मात्र शिवसेनेच्या पोटात पोटशूळ उठल्यामूळे, सेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रात मराठा समाजाच्या भावना दुखविणारे वादग्रस्त व्यंगचित्र छापण्यात आले होते. याप्रकरणी शिवक्रांती युवा सेनेने दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे खासदार, आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांच्याविरूद्ध पुंडलिकनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपर्डी येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने प्रचंड मुक मोर्चे काढण्यात येत आहेत. मराठा समाजाच्या मुक मोर्चामुळे सर्व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात मराठा समाजाच्या भावना दुखविणारे व्यंगचित्र छापण्यात आले होते. या चित्रामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. सामनामध्ये छापण्यात आलेल्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजातील स्त्रीयांचा अवमान झाला असून या प्रकरणी शिवक्रांती युवा सेनेचे संस्थापक संजय सावंत यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस चौकीत सामनाचे कार्यकारी संपादक खा.संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांच्याविरूद्ध भादंवि कलम 505 अन्वये अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवेदन देणार्‍या शिष्ठमंडळात शिवक्रांती युवा सेनेचे पदाधिकारी परमेश्‍वर नलावडे, सचिन हावळे, रविंद्र काळे, नितीन कदम, ज्ञानेश्‍वर गायकवाड, नितीन पाटील, शिवाजी जगताप, नंदु गावंडे, दिनेश मुळे, रविंद्र कदम, संतोष पठाडे आदींचा समावेश होता.