Breaking News

सेनेचे हिंदु हिताय पेक्षा ब्राह्मण हिताय धोरण!

दि. 29, सप्टेंबर - शिवसेना या पक्षांची स्थापना होवून आता पन्नासी लोटली आहे. पन्नासी गाठल्यानंतर विचारांची परिपक्वता येते. राज्यातील राजकारण कळते, काय बोलावे, आणि काय बोलू नये हे कळते. मात्र पन्नासी गाठूनदेखील शिवसेनेचा जातभिमान, आणि बहूजनद्वेष काही जायला तयार नाही. त्यामुळेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात मराठा मोर्चांची खिल्ली उडवणारे, त्यांची टिंगलटवाळी करणारे व्यंगचित्र प्रसिध्द केले जाते. यावरून शिवसेनेची सीमारेषा स्पष्ट होते. आणि सत्ता मिळविण्यासाठी बहूजनांचा वापर करायचा आणि सत्ता मात्र विशिष्ट वर्गाच्या हाती द्याची ही रणनिती महाराष्ट्राने दोन वेळेस अनुभवली आहे. 
शिवसेना ही संघटना हिंदु बहुजनांच्या बळावर पक्ष म्हणून उदयास आली. महाराष्ट्राची राजकीय सत्ता हिंदु बहुजनमतांच्या बळावर त्यांनी युतीत का असेना परंतु दोनदा बळकावली. त्यातील पहिली पंचवार्षिक म्हणजे 1995 ते 2000 या काळात खरी सत्ताधारी शिवसेना होती. त्यावेळी सलग पाच वर्षे त्यांचा मुख्यमंत्री होता. मात्र सध्याच्या युतीमध्ये शिवसेना सत्तेत सहभागीदार आहे. सत्तेपर्यंतचा प्रवास केवळ हिंदु बहुजन समाजामुळेच शिवसेनेला गाठता आला आहे. मात्र जेव्हा भूमिका घेण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा शिवसेना हिंदु हिताय पेक्षा ब्राह्मण हिताय यावर जास्त लक्ष केंद्रित करते. त्याचे अनेक उदाहरण आपल्या समोर आहे. सत्ता सपांदन बहूजनांच्या जोरावर मिळवायचे आणि मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची केलेली निवड, नंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जात असतांना नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची सोवपिलेली जवाबदारी. यातून शिवसेनेचे बहूजनप्रेम केवळ मतदानापुरते, आणि सत्ता संपादन करण्यापुरतेच आहे. सनातन संस्थेवर बंदिचा प्रश्‍न जेव्हा येतो तेव्हा ते या संस्थेची तळी उचलून धरतात. सनातन संस्था ही कोणत्या आधारावर हिंदु बहुजनांचे हितसंबंध जोपासते, असा प्रश्‍न केला तर त्याचे उत्तर नकारार्थीच येते. कारण हिंदु बहुजन समाजाचे प्रश्‍न हे पूर्णत: वेगळे आहेत. शिवसेनेसारख्या सत्ताधारी आणि जबाबदार पक्षाने आपण हिंदु बहुजनांचे हित जपण्यासाठी कार्य करतो की केवळ अल्पसंख्य ब्राह्मणांच्या हितासाठी. हिंदु समाज व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे वर्गीकरण होणे आता अत्यंत आवश्यक बनले आहे. कारण हिंदु बहुजनांच्या प्रगतीत अडथळा वारंवार याच समाज व्यवस्थेतील उच्चवर्णीय असणार्‍या ब्राह्मणी समुदायाने निर्माण केला आहे. अर्थात ब्राह्मण समुदायातील अनेक व्यक्तीमत्त्व समाजाच्या उत्थानासाठी किंवा कल्याणासाठी झटत असतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतु सामाजिक पातळीवर मात्र बहुजन हिंदुंचे अहित कसे साध्य होईल यासाठी बहुसंख्य ब्राह्मणी समुदाय कार्यरत राहतो. त्यांच्यावर एखादे संकट आले की ते हिंदुंवर संकट असल्याचा भास निर्माण केला जातो. बहुसंख्य असणार्‍या हिंदु बहुजनांना रस्त्यावर उतरविण्याचे डावपेच केले जातात. या डावपेचांना हिंदु बहुजन नेमका बळी पडतो. त्यामुळे ते कायद्याच्या कचाट्यात अटकून त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्या देशोधडीला लागतात. बहूजनांच्या अनेक पिढया देशोधडीला लावण्याचे, त्यांना रस्त्यावर उतरून कायदयाच्या कचाटयात अडकवण्याचे काम सेनेने पन्नास वर्षात वेळोवेळी केले. मात्र सत्ता हाती येताच ब्राम्हण हित नेहमीच जपले, आणि तोंडी लावण्यापुरताच बहूजनाना सहभाग दिला. त्यामुळे सामनातील व्यंगचित्र हे काही नजरचुकीतून छापलेले नाही. तर पोटात असलेले बाहेर आले, इतकाच काय तो फरक. हिंदु बहुजन म्हणून आम्ही शिवसेनेचे पाठीराखे होतो आणि शिवसेना ब्राह्मणी समुदयाचे पाठीराखे होते हा विरोधाभास नसून आता वास्तव झाले आहे. त्यामुळे पन्नासी गाठलेल्या या पक्षाने आता तरी, बाळबोधपणे विचार मांडण्याची पंरपरां सोडून द्यावी, विचारात परिपक्वता आणून, बहूजनद्वेषाला तिलांजली द्यावी हिच अपेक्षा!