खा.जाधव यांच्यासह आमदारांच्या ‘राजीनामानाट्या’ची तलवार म्यान
कोपर्डी घटनेच्या पार्श्वभुमीवर आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. या मोर्चामधुन मराठा समाजातील शोषीत पिडीत वर्गाचा उद्रेक पाहुन अनेकांच्या मनात धडकी भरलेली आहे. त्यामुळे उठता बसता फक्त राजकारण करणार्या मराठा नेत्यांनी यामध्येही लोकभावना कॅश करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मोर्चा कोणत्याही पक्षाचा वा कोणत्याही नेतृत्वात नसतांना राजकारण्यांनी आवर्जुन न बोलावता उपस्थिती दर्शविली. आणि आपण समाजासाठी केव्हावी तत्पर असतो, आपणास समाजाच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा ‘मान-पान’ लागत नाही असे दाखविले.
दरम्यान विविध जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघत असतांना शिवसेना मुखपत्रात मराठा महिलांची विटंबना करणारे व्यंगचित्र छापण्यात आले. यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली. यावेळी ‘सोने पे सुहागा’ याप्रमाणे आगामी निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना ‘गोल्डन चान्स’ मिळाला. आणि जिल्ह्याचे खासदार व शिवसेनेचे संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, सिंदखेड राजा आमदार शशिकांत खेडेकर यांनी राजीनामानाट्य सुरु केले. त्यांच्या या निर्णयाने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. आधीच संतापलेल्या शिवसेनेची पदे असलेल्या मराठा बांधवांनी आपआपल्या पदाचे राजीनामे देण्यास सुरुवात केली. परंतू कोणते ‘मांजर’ आडवे गेले आणि या लोकप्रतिनिधींनी आपापले राजीनामे मागे घेतले हे कळलेच नाही. त्यामुळे राजकारण्याला कोणतीही जात, समाज, नसतो. तो प्रत्येक ठिकाणी राजकारणच करणार हे जनतेच्या निदर्शनास आले.