Breaking News

अडथळा ठरणार्‍या वाहनांवर कारवाई

। व्यापारी व ट्रान्सपोर्ट चालक संतापले । अधिक्षकांची भेट  

अहमदनगर (प्रतिनिधी) । 29 - आडते बाजार, दाळमंडई, रामचंद्र खुंट, या परिसरात रोजच वाहतुकीची कोंडी होते. या कोंडीस बाजारपेठेतील व्यापार्‍यांचा येणारा माल, ट्रान्सपोर्टची उभी राहणारी वाहने जबाबदार आहेत. बुधवारी सकाळी आडतेबाजार,दाळमंडई परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली याचा त्रास इतर नागरिकांना झाला. त्यातच अनेकांनी याबाबत पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिस पथकाने वरील बाजारपेठेत असलेले वाहनांची  कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेऊन वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकारामुळे व्यापारी व ट्रान्सपोर्ट चालक संतापले.त्यांनी दुपारी 2 च्या सुमारास पोलिस अधिक्षक यांची भेट घेवून चर्चा केली. 
बुधवारी सकाळपासून ते दुपारपर्यंत बाजारपेठेत दुकानासमोर उभा असलेल्या ट्रान्सपोर्टच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. या कोंडीत दुचाकी वाहनांबरोबरच पादचारीही अडकले होते. अधिक्षकांकडे केलेल्या तक्रारीनंतर काही वेळातच कोतवाली व वाहतुक शाखेचे कर्मचारी बाजार पेठेत आले. त्यांनी वाहतुक कोंडीस अडथळा ठरणार्‍या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे व्यापारी व ट्रान्सपोर्ट चालक यांचा संताप अनावर झाला. त्यांनी दुकाने बंद करुन या कारवाईच्या प्रश्‍नावर पोलिस अधिक्षकांची भेट घेवून सविस्तर चर्चा करण्याचे ठरविले. त्यानुसार व्यापारी असोसिएशनचे पोपटशेठ बोथरा, भालेराव, ट्रान्सपोर्टचे पाथरकर, यांच्यासह 15 ते 20 जण यांनी अधिक्षकांची भेट घेवून गर्‍हाणे मांडले. यावेळी कोतवालीचे पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर उपस्थित होते. अधिक्षक यांनी व्यापार्‍यांनी आपला माल शहराबाहेर उतरवून टेम्पोद्वारे आणावा अथवा 10 नंतर माल उतरवा असे सुचविले.